स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक उभारण्यातही कंजुषी

By Admin | Updated: February 24, 2017 08:04 IST2017-02-24T08:04:18+5:302017-02-24T08:04:18+5:30

तीन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेने स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक

Conspiracy to build a memorial of freedom fighters | स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक उभारण्यातही कंजुषी

स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक उभारण्यातही कंजुषी

नामदेव मोरे / नवी मुंबई
तीन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेने स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक उभारण्याकडे दुर्लक्ष केले आहे. मुख्यालय उभारण्यासाठी २०० कोटी रुपये खर्च केले, पण त्याच्यासमोरील बेलापूर किल्ल्याचा बुरूज व प्रत्यक्ष किल्ल्याच्या संवर्धनासाठी एक रुपयाही खर्च करता आलेला नाही. स्वातंत्र्य सैनिक व ऐतिहासिक वारसास्थळांसाठी निधी कधी उपलब्ध करून दिला जाणार, असा प्रश्न इतिहासप्रेमी नागरिक उपस्थित करत आहेत.
नवी मुंबई वसली ती भूमिपुत्रांच्या त्यागावर. येथील मूळ निवासी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याकडे सिडको, महापालिका व शासनाने दुर्लक्ष केलेच, पण येथील ऐतिहासिक वारस्थळांचे जतन करण्यातही अपयश आले आहे. घणसोली गावाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. ग्रामस्थांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. मुंबई व ठाण्यामधील नेत्यांचे संदेश कोकणापर्यंत पोहचविण्याचे महत्त्वाचे काम केले होते. स्वातंत्र्य लढ्याची चळवळ मोडीत काढण्यासाठी इंग्रजांनी छावणी उभारली, पण ग्रामस्थांनी इंग्रजांविरोधात असहकार्य पुकारले. एकाही दुकानातून त्यांना साहित्य दिले जाणार नाही याची काळजी घेतली. दबावाला बळी न पडता लढा सुरूच ठेवला. जमावबंदी आदेश लागू केल्यानंतर गोकुळाष्टमी महोत्सवाच्या माध्यमातून एकत्र येवून लढा सुरूच ठेवला. या लढ्याची आठवण म्हणून घणसोलीमध्ये छोटे स्मारक उभारले आहे. पण सद्यस्थितीमध्ये त्याची दुरवस्था झाली आहे. भव्य स्मारक उभारण्याची आवश्यकता आहे. यामध्ये स्वातंत्र्य लढ्यात केलेल्या कामाची सविस्तर माहिती, स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो व इतर माहिती असणे आवश्यक आहे. महापालिका प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पामध्ये यासाठी तरतूद करते, परंतु प्रत्यक्षात स्मारक उभारण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज व शहिदांचे स्मारक उभारण्याचेही प्रस्तावित आहे, पण अद्याप त्यासाठी प्रस्तावही तयार करण्यात आला नाही.
बेलापूर किल्ला हे नवी मुंबईतील एकमेव ऐतिहासिक ठिकाण आहे. १५६० मध्ये बांधकाम केलेला व १७३३ मध्ये चिमाजी आप्पांनी जिंकलेला हा किल्ला शेवटची घटका मोजत आहे. किल्ला सिडको कार्यक्षेत्रामध्ये येत असला तरी महापालिकेच्या मुख्यालयासमोर किल्ल्याचा एक बुरूज आहे. किल्ल्याचा हा बुरूज आजही सुस्थितीमध्ये आहे, पण देखभाल केली जात नसल्याने तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे.
महापालिकेने पामबीच रोडवर २०० कोटी रूपये खर्च करून भव्य मुख्यालय बांधले आहे. पण मुख्यालयाच्या समोर असलेल्या या बुरूजाच्या देखभालीसाठी २०० रूपयेही खर्च केलेले नाहीत. फक्त अर्थसंकल्पात तरतूद करून खोटी आश्वासने देण्यावरच लक्ष दिले जात आहे.

Web Title: Conspiracy to build a memorial of freedom fighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.