सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने
By Admin | Updated: November 28, 2014 22:49 IST2014-11-28T22:49:52+5:302014-11-28T22:49:52+5:30
सनदशीर मार्ग डावलून सत्तेत आलेल्या भाजपा सरकारविरोधात वसई-विरार जिल्हा काँग्रेसने वसईत जोरदार निदर्शने केलीत.

सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने
वसई : सनदशीर मार्ग डावलून सत्तेत आलेल्या भाजपा सरकारविरोधात वसई-विरार जिल्हा काँग्रेसने वसईत जोरदार निदर्शने केलीत. हे आंदोलन वसई-विरार जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष दत्ता नर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले.
राज्य विधानसभेच्या अधिवेशनामध्ये गोंधळ घालून सत्तेत आलेल्या भाजपाने लोकांचा विश्वासघात केला आहे, त्यामुळे सरकारने पुन्हा विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे, या मागणीकरिता ही निदर्शने होती. त्यात जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनानंतर जिल्हाध्यक्ष दत्ता नर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर, प्रसिद्घिमाध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ता नर म्हणाले, भाजपा सरकारने सरकार स्थापनेसाठी आवश्यक 145 सदस्यांचे संख्याबळ सिद्घ केले नाही. त्यामुळे अल्पमतातील सरकारला पुन्हा एकदा बहुमत सिद्घ करण्याचे आदेश राज्यपालांनी द्यावेत, अशी आमची मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा त्यांनी इशारा दिला. (प्रतिनिधी)