हनुमाननगरला समस्यांचा विळखा

By Admin | Updated: March 8, 2017 04:36 IST2017-03-08T04:36:31+5:302017-03-08T04:36:31+5:30

तुर्भे नाका हनुमाननगरला समस्यांचा विळखा पडला आहे. महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे यापूर्वीच एका मुलाचा मृत्यू झाला असून पूर्ण वसाहतीवर अपघाताचे सावट

Conflicts of Hanumanagar | हनुमाननगरला समस्यांचा विळखा

हनुमाननगरला समस्यांचा विळखा

नवी मुंबई : तुर्भे नाका हनुमाननगरला समस्यांचा विळखा पडला आहे. महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे यापूर्वीच एका मुलाचा मृत्यू झाला असून पूर्ण वसाहतीवर अपघाताचे सावट पसरले आहे. नागरी सुविधांचाही बोजवारा उडाला असून समस्यांचा विळखा कधी सुटणार, असा प्रश्न रहिवासी उपस्थित करू लागले आहेत.
नवी मुंबईमधील सर्वात जुन्या झोपडपट्टीमध्ये हनुमाननगरचा समावेश होतो. शहराची निर्मिती सुरू झाल्यानंतर येथील दगडखाणी, रस्ते व इतर कामांसाठी मनुष्यबळ व बांधकाम साहित्य पुरविण्याचा ठेका बंजारा समाजाकडे होता. यामुळे येथे बंजारा वसाहत उभी राहिली. यानंतर टप्प्याटप्प्याने दगडखाण मजूर व इतरांनी या परिसरात वास्तव्य सुरू केले. हनुमाननगरबरोबर आंबेडकरनगर वसाहतही उभी राहिली. वाढलेल्या लोकसंख्येबरोबर येथील समस्याही वाढू लागल्या आहेत. हनुमाननगरमध्ये लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या ही सर्वात गंभीर समस्या बनली आहे. महावितरणने चार वर्षांपूर्वी मीटर बॉक्स बसविण्यासाठीचा ठेका दिला होता. पण ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले. सहा महिन्यांमध्ये सर्व मीटर रूमचे दरवाजे तुटले आहेत. याशिवाय पूर्ण वसाहतीमध्ये वीजवाहिन्या लोंबकळत आहेत. या मीटरबॉक्सला हात लागल्याने विजेचा धक्का बसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी येथील विजेचा पोल कापून उरलेले साहित्य तिथेच ठेवले होते. या पोलला विजेचा धक्का लागून एक तरूणाचा मृत्यू झाला. यानंतरही महावितरण प्रशासनाला जाग आलेली नाही. येथील वीजवाहिन्या व वीजमीटर दुरूस्त करण्यासाठीचे काम युद्धपातळीवर केले नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हनुमाननगरच्या मागील बाजूला एक २० ते २५ फूट खोल खड्डा होता. या खड्ड्याचा वापर कचराकुंडीप्रमाणे केला जात होता. पूर्ण खड्ड्यात कचरा टाकण्यात आला असून तो भूखंड ताब्यात घेवून तेथे उद्यान विकसित करण्याची मागणी केली जात आहे.
या परिसरात बेकरी व इतर उद्योजकांनी गॅस सिलिंडर साठविण्यासाठी अतिक्रमण केले आहे. गॅसचा स्फोट होवून कोणत्याही क्षणी पूर्ण वसाहतीला आग लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंबेडकर नगरमधील समस्याही वाढत आहेत. येथील व्यावसायिकांनी पदपथावर साहित्य ठेवले आहे. यामुळे पदपथावरून चालणे अशक्य झाले आहे. गटारांची स्थितीही बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिसरातील समस्या सोडविण्यासाठी यापूर्वीचे नगरसेवक अमित मेढकर, विद्यमान नगरसेविका पूजा मेढकर यांच्यासह शिवसेनेचे शाखा प्रमुख तय्यब पटेल व इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पण प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने समस्या गंभीर होत चालल्या आहेत.

महापालिकेकडे पाठपुरावा
शिवसेनेचे शाखाप्रमुख तय्यब पटेल यांनी हनुमाननगर व आंबेडकरनगरमधील समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन व महावितरणकडे पाठपुरावा सुरू केला आहे. डंपिंग ग्राऊंडचा प्रस्तावित सेल सुरू न करण्याची मागणी केली आहे. प्रश्न सोडविण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. भविष्यात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कोणाचा मृत्यू झाला तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लोकप्रतिनिधींचाही पाठपुरावा
माजी नगरसेवक अमित मेढकर व नगरसेविका पूजा गणेश मेढकर यांनीही वसाहतीच्या मागील बाजूला असणारी मोकळी जागा ताब्यात घ्यावी. तेथील कचरा काढून योग्य भरणी करण्यात यावी व या जागेचा उद्यानासाठी वापर करण्यात यावा अशी मागणी केली आहे. संजीवनी कॉरीच्या जागेवर डंपिंग ग्राऊंड तयार करण्यासही विरोध दर्शविला आहे.

Web Title: Conflicts of Hanumanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.