औषध विक्रेत्यांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद
By Admin | Updated: May 31, 2017 06:27 IST2017-05-31T06:27:59+5:302017-05-31T06:27:59+5:30
आॅनलाइन औषध विक्रीविरोधात शहरातील केमिस्ट संघटनेने मंगळवारी एक दिवसाचा बंद पाळला. आॅनलाइन औषध विक्रीच्या

औषध विक्रेत्यांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद
नवी मुंबई : आॅनलाइन औषध विक्रीविरोधात शहरातील केमिस्ट संघटनेने मंगळवारी एक दिवसाचा बंद पाळला. आॅनलाइन औषध विक्रीच्या संदर्भात शासनाने कायदा करताना औषध विक्रेत्यांना विश्वासात घेतले नसल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. त्यानुसार सानपाडा येथे बैठक घेवून शासनाने या आंदोलनाची देखील दखल न घेतल्यास पुढच्या भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली.
शासनाने ग्राहकांच्या सोयीनुसार काही औषधांची आॅनलाइन विक्री करण्याला मंजुरीच्या हालचाली चालवल्या आहेत. त्याकरिता नवा कायदा देखील तयार केला जात आहे. या कायद्यानुसार आॅनलाइन व ई-पोर्टल याद्वारे औषधांची विक्री शक्य होणार आहे. परंतु हा कायदा करताना शासनाने औषध विक्रेत्यांना विश्वासात घेतले नसल्याचे त्यांचे म्हणणे
आहे.
यामुळे केमिस्ट संघटनेकडून राज्यव्यापी बंदची घोषणा करण्यात आलेली. त्यानुसार नवी मुंबई केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे नवी मुंबईत एक दिवसीय बंदचे आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये शहरातील सुमारे ६०० औषध विक्रेत्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्यांच्याद्वारे नवी मुंबई ते आझाद मैदान दरम्यान मोटारसायकल रॅली देखील काढली जाणार होती. मात्र आझाद मैदानावर रॅलीची परवानगी न मिळाल्यामुळे सानपाडा येथील केमिस्ट भवनमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राकेश नलावडे, सचिव सुनील छाजेड, राजेंद्र जाधव, लालाराम चौधरी, शंकर जेजुरकर, संदीप देशमुख, भुंडाराम चौधरी आदी उपस्थित होते.
या आंदोलनानंतरही शासनाने औषध विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेतली नाही, तर पुढची भूमिका ठरवण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे छाजेड यांनी सांगितले. आॅनलाइन औषध विक्रीसंदर्भात कायदा झाल्यास औषध विक्रेत्यांना त्याची अंमलबजावणी करण्यात काही अडचणी उद्भवणार आहेत. त्याची दखल शासनाने घेण्याची गरज असून, सरकारला त्याची जाणीव करुन देण्याच्या उद्देशाने हा बंद करण्यात आल्याचेही सुनील छाजेड यांनी सांगितले.