वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात महिला कर्मचाऱ्याची तक्रार
By Admin | Updated: September 9, 2015 00:08 IST2015-09-09T00:08:13+5:302015-09-09T00:08:13+5:30
सीडब्ल्यूसीचे अधिकारी लैंगिक शोषणासाठी पिळवणूक करत असल्याची तक्रार तिथल्याच कामगार महिलेने पोलिसांकडे केली आहे. पतीच्या निधनानंतर त्याच्या जागी नोकरीवर

वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात महिला कर्मचाऱ्याची तक्रार
नवी मुंबई : सीडब्ल्यूसीचे अधिकारी लैंगिक शोषणासाठी पिळवणूक करत असल्याची तक्रार तिथल्याच कामगार महिलेने पोलिसांकडे केली आहे. पतीच्या निधनानंतर त्याच्या जागी नोकरीवर लागलेली ही महिला गेली १५ वर्षांपासून वरिष्ठांच्या त्रासाने पीडित आहे. तक्रारीनंतरही संबंधितांना एपीएमसी पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याचा आरोप महिलेने केला आहे.
तुर्भे येथील सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन कंपनीत काम करणाऱ्या महिलेने तिथल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. तर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर संबंधितांचा त्रास वाढला असून त्याचा मनस्ताप होत असल्याचेही महिलेचे म्हणणे आहे. पतीच्या निधनानंतर त्याच्या जागी नोकरी देण्याकरिता सीडब्ल्यूसीच्या संबंधित अधिकाऱ्याने या महिलेकडे ५० हजार रुपये लाच मागितली होती. तसेच हॉटेलमध्ये भेटण्याचा निरोप सेक्रेटरीमार्फत धाडला होता. याबाबत महिलेने सीडब्ल्यूसीच्या वरिष्ठांकडे तक्रार करून त्या अधिकाऱ्याच्या मर्जीविरोधात नोकरी मिळवलेली आहे. तेव्हापासून छळ होत असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटलेले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याकडून शारीरिक शोषणासाठी होत असलेल्या त्रासाची तक्रार सदर महिलेने एपीएमसी पोलिसांकडे केली आहे. परंतु तक्रार करूनही संबंधितावर कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे. तर अधिकाऱ्याविरोधात तक्रार केल्यामुळे सीडब्ल्यूसीमध्ये प्रवेशबंदी करून नियमबाह्य बदली करण्यात आल्याचेही महिलेचे म्हणणे आहे.
यापूर्वी एका महिलेने फसवणूक व बलात्काराची तक्रार एपीएमसी पोलिसांकडे केली होती. परंतु तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर तिने आयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अश्लील फोनमुळे त्रस्त तरुणी पोलिसांकडे तक्रारीसाठी आली होती. तिचीही तक्रार घेण्यात आली नाही. अखेर तत्कालीन एका अधिकाऱ्याने तिची दखल घेत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षकपदी असलेली महिला महिलांच्या तक्रारीकडे दाद देत नसल्याचा अनेकींचा अनुभव आहे.