वाहतूक पोलीस शिंदे यांना श्रध्दांजली
By Admin | Updated: September 2, 2016 03:52 IST2016-09-02T03:52:00+5:302016-09-02T03:52:00+5:30
कर्तव्य बजावताना दुचाकीस्वाराच्या भावाने केलेल्या मारहाणीत जीव गमवावा लागलेल्या वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना जुईनगर येथील शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने

वाहतूक पोलीस शिंदे यांना श्रध्दांजली
नवी मुंबई : कर्तव्य बजावताना दुचाकीस्वाराच्या भावाने केलेल्या मारहाणीत जीव गमवावा लागलेल्या वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना जुईनगर येथील शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने वाहनधारकांना करण्यात आले. यावेळी ५५0 वाहनधारकांना पोलिसांच्या प्रति आदराची भावना बाळगण्याची शपथ देण्यात आली.
जनतेच्या सुरक्षिततेसाठी पोलीस कर्मचारी सदैव तत्पर असतात. स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता जनतेच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या समस्त पोलीस कर्मचाऱ्यांचा आदर बाळगायला हवा. परंतु समाजातील काही घटकांकडून पोलिसांना दुय्यम वागणूक दिली जाते. याच मनोवृत्तीमुळे कर्तव्यदक्ष विलास शिंदे या वाहतूक पोलिसाला आपला जीव गमवावा लागला. अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने कायदा आणि वाहतूक नियमाचे पालन करावे, असे आवाहन ट्रस्टच्या माध्यमातून वाहनधारकांना करण्यात आले. जुईनगर सेक्टर २३ येथील पेट्रोलपंपाजवळ ट्रस्टच्या वतीने दिवंगत विलास शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी मोठा फलक लावण्यात आला होता. या फलकावर मी पोलिसांचा आदर बाळगेन, वाहतुकीच्या नियमांचे पालन करेन, अशा आशयाचे शपथपत्र लिहिण्यात आले होते. वाहनधारकांना हे शपथपत्र वाचून या फलकावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. त्याला संध्याकाळपर्यंत विविध वयोगटातील ५५0 वाहनधारकांनी प्रतिसाद दिला. यात रिक्षा चालक, दुचाकी चालक व कार चालकांचा समावेश होता. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गणेश शेळके, नीलेश पवार, आकाश कालंगे, अक्षय म्हस्के, अनिकेत म्हस्के, वैभव पवार, राहुल खेडेकर आदींच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)