आयुक्तांनी घेतली महापौरांची भेट

By Admin | Updated: October 16, 2016 03:39 IST2016-10-16T03:39:00+5:302016-10-16T03:39:00+5:30

महापौरांनी मुख्यालयावर टाकलेला बहिष्कार व आरपीआयने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. प्रशासन व लोकप्रतिनिधी

The Commissioner met a Mayor | आयुक्तांनी घेतली महापौरांची भेट

आयुक्तांनी घेतली महापौरांची भेट

नवी मुंबई : महापौरांनी मुख्यालयावर टाकलेला बहिष्कार व आरपीआयने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामधील वादामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रबाळेमध्ये जाऊन महापौरांची भेट घेतली व मंदातार्इंना चहाचे आमंत्रण दिल्यामुळे राजकीय वादावर पडदा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गत तीन महिन्यांपासून आयुक्त व लोकप्रतिनिधी यांच्यामधील संवाद कमी होऊ लागला होता. आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून एकदाही भेट घेतली नसल्यामुळे व प्रशासनातील अधिकारी दिलेल्या आदेशाचे पालन करीत नसल्याने महापौर सुधाकर सोनावणे यांनी महापालिका मुख्यालयात जाणे बंद केले आहे. लोकशाहीचा गळा घोटला जाणार असेल व लोकांची कामे करता येणार नसतील तर फक्त खुर्चीवर बसण्यासाठी मुख्यालयात जाणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. यामुळे कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर होण्यासाठी सर्वसाधारण सभा होणार की नाही याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
आरपीआयने पत्रकार परिषद घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे दलित महापौरांचा अवमान होत असल्याचा समज पसरू लागला होता.
शहरात निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. महापौरांना फोन करून भेटण्यासाठी येत असल्याचे कळविले. रबाळेमधील राजश्री शाहू विद्यालयामध्ये दोघांची भेट झाली. चर्चा काय झाली याविषयी दोघांनीही मौन पाळले असले तरी यामुळे कोंडी फुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आमदार मंदा म्हात्रे व आयुक्तांमध्येही संघर्ष निर्माण झाला होता. प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरील कारवाई. ईटीसी व इतर विषयांवरून मतभेद वाढले होते. यामुळे लोकप्रतिनिधी विरुद्ध आयुक्त यांच्यामधील संघर्ष राज्यभर गाजला होता. आयुक्तांनी या वादावरही पडदा टाकण्यासाठी मंदाताई म्हात्रे यांना कार्यालयात चहाचे आमंत्रण दिले. लोकहितासाठी आयुक्तांनी पाठविलेले आमंत्रण स्वीकारून आमदारांनी मुख्यालयात जाऊन आयुक्तांशी चर्चा केली. प्रशासन चांगले काम करणार असेल तर आमचा काहीही आक्षेप नसणार आहे. कोणतेही वैयक्तिक काम घेऊन आम्ही पालिकेत येत नाही व पुढेही येणार नाही, असे म्हात्रे यांनी स्पष्ट कले. परंतु ईटीसी केंद्राची चौकशी करण्याच्या विषयावर ठाम असल्याचे त्यांनी आयुक्तांना सांगितले. याशिवाय शहरातील विकासकामांवरही दोघांमध्ये चर्चा झाली.

Web Title: The Commissioner met a Mayor