प्लॅस्टिक जमा करण्यासाठी संकलन केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:35 IST2018-03-30T02:35:07+5:302018-03-30T02:35:07+5:30
राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी आणली; मात्र घर, दुकान आदी ठिकाणी असलेले प्लॅस्टिक कुठे टाकावे, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

प्लॅस्टिक जमा करण्यासाठी संकलन केंद्रे
मुंबई : राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी आणली; मात्र घर, दुकान आदी ठिकाणी असलेले प्लॅस्टिक कुठे टाकावे, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. त्यामुळे प्लॅस्टिक बॅग, सजावटीचे प्लॅस्टिक साहित्य, थर्माकोल आदी सामान नागरिकांना जमा करता यावे, यासाठी महापालिका २० ठिकाणी संकलन केंद्रे स्थापन करणार आहे. बाजार आणि रेल्वे स्थानक अशा वर्दळीच्या ठिकाणी ही केंद्रे सुुरू करण्यात येणार आहेत.
राज्य सरकारने प्लॅस्टिकचे उत्पादन, वापर, साठा करणं यावर बंदी आणली आहे. त्यानुसार घरात असलेले प्लॅस्टिक फेकण्यास व त्याचा वापर थांबविण्यास ग्राहकांना १५ दिवस ते एक महिना तर उत्पादकांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत ग्राहक आणि उत्पादकांनी आपल्याकडील प्लॅस्टिक संकलन केंद्रामध्ये जमा करावे. या केंद्रात एकत्रित केलेल्या प्लॅस्टिकवर पुन:प्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार या संकलन केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे.
प्रत्येक वॉर्डात प्लॅस्टिकवर पुन:प्रक्रिया करणाऱ्या संस्थांची यादी तयार करण्यात येत आहे. ही यादी महापालिकेच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात येणार आहे. तूर्तास एक महिनाभर महापालिका केवळ प्लॅस्टिक बंदीबाबत जागृती करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच या मोहिमेत सिनेतारका अथवा
नामवंत व्यक्तींची मदत घेऊन नागरिकांना ‘प्लॅस्टिकमुक्त मुंबई’चा संदेश देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.