रायगड बाजारमुळे गोंधळ
By Admin | Updated: December 11, 2015 01:25 IST2015-12-11T01:25:04+5:302015-12-11T01:25:04+5:30
रायगड बाजार उभारण्याबाबतच्या अडचणीत सातत्याने भर पडत असतानाच आता दस्तुरखद्द या प्रकरणी नगर पालिकेतील सर्व सदस्यांचे सदस्यत्वच अनहर्त करण्याबाबत

रायगड बाजारमुळे गोंधळ
अलिबाग : रायगड बाजार उभारण्याबाबतच्या अडचणीत सातत्याने भर पडत असतानाच आता दस्तुरखद्द या प्रकरणी नगर पालिकेतील सर्व सदस्यांचे सदस्यत्वच अनहर्त करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ डिसेंबरला ठेवली आहे. त्यामुळे सत्ताधारी शेकापपुढे फार मोठे आव्हान उभे राहिले आहे.
अलिबाग येथील अॅड. सागर पाटील आणि किशोर अनुभवणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबतची याचिका ३० नोव्हेंबर २०१५ ला दाखल केली आहे. रायगड बाजारच्या इमारतीचे बांधकाम अनधिकृत असल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात भाजपाचे अॅड.महेश मोहिते यांनी याचिका दाखल केली आहे, तर दुसरीकडे अॅड. सागर पाटील आणि किशोर अनुभवणे यांनी जिल्हा प्रशासनाकडे याचिका दाखल केली आहे. त्यामुळे रायगड बाजारमुळे अलिबागची अख्खी नगरपालिका गोत्यात आल्याचे बोलले जाते. काँग्रेस आणि भाजपाने या प्रश्नी शेकापला चांगलेच कोंडीत पकडले असल्याचे चित्र आहे.
अलिबाग नगर पालिकेच्या मालकीची स.नं.७ /२ सि.स.नं.१३२४ मधील १२४० चौ.मी. जागेच्या भाडे मूल्यांकन आणि निविदेबाबत अलिबाग नगर पालिकेने २२ मे २०१५ला सर्वसाधारण सभा घेतली होती. यासाठी ६२० क्रमांकाचा ठरावही घेतला होता. तो चुकीचा असून ठराव रद्द करावा आणि बांधकाम निष्कासित करुन ही जागा पुन्हा अलिबाग नगर पालिकेच्या ताब्यात द्यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. त्यानंतर १ जून २०१५ ला झालेल्या सर्वसाधरण सभेमध्ये श्रीबाग सहकारी मध्यवर्ती ग्राहक मंडळ लि.ला भाडेपट्ट्याने जमीन देण्याचा मुद्दा होता. यासाठी ६२१ ठराव क्रमांकाने नगर पालिकेने ठराव घेत श्रीबाग संस्थेला जमीन दिली.
मुळात या जमिनीचे मूल्यांकन बाजार भावाप्रमाणे नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हाही ठराव बेकायदा असल्याने म.न.न.प. औद्योगिक नगर अधिनियम १९६५ चे कलम ३०८ अन्वये नगर पालिका तहकूब करणे आणि सर्व सदस्य अनहर्त करावेत, अशीही मागणी केली आहे. (प्रतिनिधी)