स्मार्ट सिटीसाठी मुख्यमंत्र्यांचा दिलासा
By Admin | Updated: December 12, 2015 01:51 IST2015-12-12T01:51:54+5:302015-12-12T01:51:54+5:30
सत्ताधाऱ्यांनी विरोध केला तरी नवी मुंबई स्मार्ट सिटी करण्यासाठी शिवसेना व भाजपा नेत्यांनी पुढाकार घेतला आहे.

स्मार्ट सिटीसाठी मुख्यमंत्र्यांचा दिलासा
नवी मुंबई : सत्ताधाऱ्यांनी विरोध केला तरी नवी मुंबई स्मार्ट सिटी करण्यासाठी शिवसेना व भाजपा नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना वस्तुस्थिती सांगितले. मुख्यमंत्र्यांनी १५ डिसेंबरपर्यंत या स्पर्धेसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या असून त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.
स्मार्ट सिटी स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये नवी मुंबईला देशात तिसरे व राज्यात प्रथम मानांकन मिळाले होते. यामुळे ९८ शहरांच्या स्पर्धेमध्ये नवी मुंबईला पहिला क्रमांक मिळेल असा विश्वास नागरिकांना वाटू लागला होता. पहिल्यांदाच विकासकामांचे धोरण ठरविताना नागरिकांचे मत ऐकून घेण्यात आले होते.
चार लाख नागरिकांनी त्यांच्या संकल्पना महापालिकेस कळविल्या होत्या. परंतु सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसने बहुमताच्या जोरावर प्रस्ताव फेटाळल्यामुळे महापालिकेच्या सहभागाविषयी शंका उपस्थित केली जात होती. याविषयी शहरवासीयांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. शिवसेना व भाजपाने आंदोलन करून राष्ट्रवादीचा निषेध केला. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार मंदा म्हात्रे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
राष्ट्रवादी काँगे्रसने राजकारण करून स्मार्ट सिटीचा प्रस्ताव फेटाळला आहे. परंतु शहरवासीयांना स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभाग हवा आहे.
नवी मुंबई देशातील एक क्रमांकाचे शहर झाले पाहिजे अशी सर्वांची भावना असल्याचे सांगितले.
स्मार्ट सिटीविषयी प्रस्ताव १५ डिसेंबरच्या आतमध्ये केंद्र शासनाकडे पाठविणे आवश्यक आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी माहिती घेवून तत्काळ हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. यामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळणार असून स्मार्ट सिटी स्पर्धेतील सहभागी होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही राज्याच्या मुख्य सचिवांना स्मार्ट सिटी प्रस्तावाचे प्रेझेंटेशन दाखविले. महापालिका ८ हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी बॅकफूटवर जाणार आहे.
स्मार्ट सिटी प्रस्तावाविषयी आक्षेप असतील तर ते दुरूस्त करावे परंतु राजकारण करून स्पर्धेतून माघार घेवू नये, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करू लागले आहेत. (प्रतिनिधी)
नवी मुंबईचा स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभाग झालाच पाहिजे अशी लोकभावना आहे. प्रस्तावामध्ये काही त्रुटी असतील तर त्यामध्ये सुधारणा करता येवू शकते.त्यासाठी स्पर्धेतून माघार हा उपाय नाही. यामुळे स्मार्ट सिटीसाठी वेळेत प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याच्या सुचना दिल्या आहेत.
- एकनाथ शिंदे,
पालकमंत्री, ठाणे