क्लॉक टॉवर ठरतोय आकर्षण; परिसराच्या शोभेत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:01 IST2019-09-12T00:01:02+5:302019-09-12T00:01:18+5:30
मुंबईच्या धर्तीवर नवी मुंबईतही आकर्षक घड्याळ

क्लॉक टॉवर ठरतोय आकर्षण; परिसराच्या शोभेत भर
नवी मुंबई : पालिकेच्या वतीने एपीएमसी येथे आकर्षक क्लॉक टॉवर उभारण्यात आला आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. मुंबईच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या या क्लॉक टॉवरमुळे परिसराच्या शोभेत भर पडणार आहे.
वाशी-तुर्भे मार्गावर एपीएमसी येथील कै. रामदास जानू पाटील चौकात हे क्लॉक टॉवर उभारण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेने सुमारे १७ लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. मागील चार महिन्यांपासून त्याचे काम सुरू होते. सुमारे १४ मीटर उंचीच्या या क्लॉक टॉवरमुळे परिसराची शोभा वाढली असून परिसरातून ये-जा करणाऱ्यांचेही ते लक्ष वेधत आहे. या टॉवरच्या उंचावर चार दिशेला चार घड्याळे बसवली आहेत. मुंबईतील राजाबाई चौकातील क्लॉक टॉवरप्रमाणेच हा टॉवर उभारण्यात आला आहे, तर मुंबईनंतर राज्यातला हा पहिलाच क्लॉक टॉवर ठरणार आहे.
या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून ठाणे-बेलापूर मार्गाला व सायन-पनवेल मार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा चौक आहे. यामुळे हा टॉवर राज्यभरातून व्यापाराच्या निमित्ताने एपीएमसीत येणाऱ्यांचे लक्ष वेधत आहे. अशा प्रकारचा क्लॉक टॉवर देशात काही ठरावीक ठिकाणीच असून ते तिथल्या शहरांचे पर्यटनस्थळ ठरत आहेत. त्यानुसार हा टॉवर नवी मुंबईला भेट देणाºयांचे आकर्षण केंद्र ठरणार आहे.