लोगोवरील दावा सोडणार नाही
By Admin | Updated: September 23, 2015 23:50 IST2015-09-23T23:50:08+5:302015-09-23T23:50:08+5:30
मीरा-भार्इंदर पालिकेतील कामचुकार अधिकाऱ्यांमुळे प्रशासनावर गेल्या २४ वर्षांपासून वापरात असलेला अनोंदणीकृत लोगो सेव्हन ईलेव्हन ग्रुप आॅफ कंपनीज्ने हायजॅक केला असला

लोगोवरील दावा सोडणार नाही
राजू काळे, भार्इंदर
मीरा-भार्इंदर पालिकेतील कामचुकार अधिकाऱ्यांमुळे प्रशासनावर गेल्या २४ वर्षांपासून वापरात असलेला अनोंदणीकृत लोगो सेव्हन ईलेव्हन ग्रुप आॅफ कंपनीज्ने हायजॅक केला असला तरी त्यावरील दावा आम्ही कदापी सोडणार नसल्याचा पावित्रा लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे जागे झालेल्या प्रशासनाने घेतला आहे.
ग्रामपंचायतीनंतर १९९१ मध्ये प्रथमच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांनी त्यावेळचे नगरसेवक लियो कोलासो यांनी ९ ग्रामपंचायतीसह आरोग्य सेवा, शहरीकरण, शेतकरी, मीठागरे, डोंगराळभाग आदींचा समावेश असलेला लोगो तयार करुन तो मान्यतेसाठी नियोजन समितीपुढे ठेवला होता.
त्यावेळचे नगराध्यक्ष गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या नेतृत्वाखालील समितीने लोगोला मान्यता दिल्यानंतर तसा लेखी ठराव पालिका दप्तरी असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक आसिफ शेख यांनी लोकमतला दिली आहे. तेव्हापासून हा लोगो पालिका व्यवहारात असून तो अद्यापही नोंदणीकृत न झाल्यावर मात्र त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अखेर तो भाजपा आ. नरेंद्र मेहतांच्या सेव्हन ईलेव्हन ग्रुप आॅफ कंपनीज्ने नोव्हेंबर २०१३ मध्ये नोंदणीकृत केल्याचे कंपनीच्या सूत्रांकडून सांगण्यात आल्याने पालिकेवर, अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या लोगोला गमावण्याची नामुष्की ओढवली आहे. हा संतापजनक प्रकार लोकमतने २१ सप्टेंबरच्या अंकातील वृत्तातून उजेडात आणल्यानंतर शहरभर त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. अनेक राजकीय पक्ष प्रशासनाच्या नाकर्तेपणावर आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याने प्रशासनाकडून सारवासारव करण्यास सुरुवात झाली आहे.
पालिका उपायुक्त (मुख्यालय) गणेश देशमुख यांनी, संबंधित कंपनीने लोगोच्या नोंदणीसाठी जानेवारी २०१४ मध्ये अर्ज केल्याचा दावा करुन पालिकेला त्याची माहिती दिल्यानंतर मार्च २०१४ मध्ये प्रशासनाने लोगो नोंदणीसाठी अर्ज केल्याची माहिती दिली आहे. परंतु, कंपनीने दीड वर्षांपूर्वीच लोगो नोंदणीकृत केला असतानाही अद्याप महापालिकेचा लोगो नोंदणीकृत झालेला नाही. नोंदणी अर्जानंतर तो १९ महिन्यानंतर नोंदणीकृत करण्यात येत असल्याचा दावाही उपायुक्तांनी केला आहे. काहीही असो अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या लोगोवरील दावा मात्र पालिका कोणत्याही स्थितीत सोडणार नसल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले आहे.