वाढत्या प्रदूषणामुळे नागरी आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: August 18, 2016 05:03 IST2016-08-18T05:03:51+5:302016-08-18T05:03:51+5:30
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईभोवती प्रदूषणाचा विळखा वाढतच चालला आहे. हवा व ध्वनिप्रदूषणाने धोक्याची मर्यादा ओलांडली आहे. धूलिकणांमुळे हृदय व श्वसनाशी

वाढत्या प्रदूषणामुळे नागरी आरोग्य धोक्यात
- नामदेव मोरे, नवी मुंबई
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईभोवती प्रदूषणाचा विळखा वाढतच चालला आहे. हवा व ध्वनिप्रदूषणाने धोक्याची मर्यादा ओलांडली आहे. धूलिकणांमुळे हृदय व श्वसनाशी संबंधित आजार होत असून, गोंगाटामुळे मानसिकस्वास्थ्य ढासळू लागले आहे.
निसर्गाचे वरदान लाभलेल्या नवी मुंबईमध्ये विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. दिवा ते दिवाळेपर्यंतचा खाडीकिनारा व दिघा ते बेलापूरपर्यंत डोंगररांगा असल्यामुळे एके काळी हा पट्टा प्रदूषणविरहित होता, परंतु औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपन्यांचा धूर, बांधकामांसाठी पोखरलेला डोंगर, दगडखाणीचे प्रदूषण थांबविण्याकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे दिवसेंदिवस येथील हवा दूषित झाली आहे. देशातील प्रदूषणाची प्रमाण अधिक असणाऱ्या शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश झाला आहे. आरोग्यास घातक धूलिकण वाढले आहेत. नायट्रेड व सल्फेटसारखी सेंद्रीय रसायने, धातू, धूलिकण यांच्यामुळे शहरवासीयांना श्वसन व हृदयाशी संबंधित अजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तुर्भे व दगडखाण परिसरात राहणाऱ्या नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. पाच वर्षांमध्ये शहरातील चारही सनियंत्रित हवा गुणवत्ता तपासणी केंद्रामध्ये पीएम १०चे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले असल्याचा उल्लेख महापालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये केला आहे. शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाहनांमुळे वातावरणात धूर पसरत आहे. दगडखाणींमुळे धुळीचे कण पसरत आहेत. याशिवाय शहरात अनेक ठिकाणी हॉटेल, बेकरी व इतर व्यवसायांमुळे हवा प्रदूषित होत आहे. महापालिका प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करत असली, तरी प्रदूषण पसरविणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने, दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे.
पालिकेच्या सन २०१५-१६च्या अहवालामध्येही सर्वच नोडमध्ये ध्वनिप्रदूषणाची स्थिती बिकट असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये दिवसा ५५ व रात्री ४५ डेसिबल एवढा आवाज असणे आवश्यक आहे, परंतु जुईनगरमध्ये हे प्रमाण ६१.५ एवढे आहे. तुर्भेमध्ये ६१, सानपाडामध्ये ६० व नेरूळमध्ये ५८ एवढे असल्याचे निदर्शनास आले आहे. निवासी क्षेत्रामध्ये घणसोलीत ५९.५, ऐरोलीमध्ये व नेरूळमध्ये ५८.५, वाशी हॉस्पिटलमध्ये ५८ डेसिबल एवढ्या आवाजाची नोंद झाली आहे. शहरातील सर्वच शांतता क्षेत्रामध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
वाशी मनपा हॉस्पिटल, राजीव गांधी कॉलेज, सेंट लॉरेंस, शेतकरी संस्था घणसोलीमध्ये ध्वनीची पातळी ५९.५० एवढी नोंद झाली आहे.
सायन-पनवेल महामार्ग, ठाणे
बेलापूर रोड व अंतर्गत रोडवर
वाढलेली वाहने, कर्णकर्कश हॉर्न यामुळे ध्वनिप्रदूषणांमध्ये वाढ झाली
आहे.
धूलिकण ठरताहेत धोकादायक
वातावरणातील पीएम १० चे प्रमाण धोकादायक व धूलिकण, सुक्ष्मकण व ऐरोसोल यांचे क्लिष्ट मिश्रण असते. यामध्ये नायट्रेट व सल्फेटसारखी सेंद्रीय रसायणे, धातू, धूलिकण यांसारख्या घटकांचा समावेश होतो. १० मायक्रॉन किंवा त्याहून कमी व्यास असलेले धूलिकण घसा व श्वसनातून फुप्फुसात प्रवेश करू शकतात. ते शरीरात गेल्यामुळे गंभीर शारीरिक विकार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोपरखैरणे व तुर्भे परिसरात धूलिकणांचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
फुप्फुस व हृदयविकारामुळे मृत्यू
हवेतील ओझोन, सुक्ष्म, धूलिकण व इतर हवेमध्ये निर्माण होणाऱ्या विषारी प्रदूषकांमुळे होणाऱ्या हानिकारक आरोग्य परिणामांपासून, विशेषत: लहान मुले व वयस्कर व्यक्तिंना दमा, श्वसनाचे विकार, क्रोनिक ब्राँकायटीस व इम्फायझेमा असे गंभीर आजार होतात. डब्ल्यूएचओ च्या अहवालाप्रमाणे, हवेतील प्रदूषणाशी संबंधित १४ टक्के मृत्यू हृदयविकारामुळे व ६ टक्के मृत्यू फुप्फुसाच्या कर्करोगामुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
मानसिक
स्वास्थ्य ढासळतेय
ध्वनिप्रदूषण गंभीर समस्या बनली आहे. निवासी, शांतता, व्यवसायिक क्षेत्रामध्ये दिवसा व रात्रीही आवाजाच्या निकषांचे सर्रास उल्लंघन होत आहे. वाढलेल्या गोंगाटाचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर होत आहे. मानसिक स्वाथ्य बिघडत असून निद्रानाश व स्वभावात चिडचिडेपणा वाढत आहे.
कार्बन मोनोआॅक्साइडचे प्रमाण वाढतेय
हवेतील कार्बन मोनोआॅक्साइडच्या प्रमाणात ऋतुमानानुसार बदल होत आहेत. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान प्रमाण जास्त वाढते. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान ऐरोलीमध्ये निकशापेक्षा १२ पट जास्त प्रमाण असल्याचे स्पष्ट झाले आहे.