शहरात गांजा विक्रीच्या अड्ड्यांवर धाडसत्र
By Admin | Updated: July 30, 2016 04:40 IST2016-07-30T04:40:21+5:302016-07-30T04:40:21+5:30
अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांनी नवी मुंबईमध्ये नेरूळ, तुर्भे नाका, इंदिरानगर, एपीएमसी, कोपरखैरणे, वाशी परिसरामध्ये दुकाने सुरू केली आहेत. ‘लोकमत’च्या टीमने

शहरात गांजा विक्रीच्या अड्ड्यांवर धाडसत्र
नवी मुंबई : अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांनी नवी मुंबईमध्ये नेरूळ, तुर्भे नाका, इंदिरानगर, एपीएमसी, कोपरखैरणे, वाशी परिसरामध्ये दुकाने सुरू केली आहेत. ‘लोकमत’च्या टीमने या अड्ड्यांवर खुलेआम गांजा विकला जात असल्याचे उघडकीस आणताच अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व पोलीस निरीक्षक माया मोरे यांनी एपीएमसीजवळ धाड टाकून गांजाची झाडे ताब्यात घेतली आहेत. या रोपांची लागवड करणाऱ्या पप्पू साजीद खानला अटक केली.
एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये गांजा विक्री करणाऱ्यांनी तेथून पळ काढला असून तेथील विक्री बंद झाली आहे. तुर्भे इंदिरानगरमध्ये यापूर्वी गांजा विक्री करणारी पानटपरी तेथून हलविण्यात आली आहे. पोलिसांनी यापूर्वी गांजा विकणाऱ्या पाच ते सहा जणांना ताब्यात घेवून चौकशी केली असता एपीएमसीमधील राजू नावाची व्यक्ती तेथे गांजा विकत असल्याचे तपासात पुढे आले आहे.
नेरूळ सेक्टर २४ मध्ये बालाजी टेकडीच्या पायथ्याशी गांजा विक्रीचा मोठा अड्डा होता. महाविद्यालयीन तरुण येथून गांजा खरेदी करत होते. पोलिसांनी पहाटेच या झोपडीवर धाड टाकली. येथे गांजा विक्री करणारी महिला शोभा मोहन गोपीला अटक करून २३० ग्रॅम गांजा जप्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. शहरात इतरही ठिकाणी कुठे गांजा किंवा इतर अमली पदार्थांची विक्री होत आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
शहरात खळबळ
खुलेआम सुरू असलेल्या गांजा विक्रीचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन प्रसिद्ध करताच शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गांजा विक्रीच्या अड्ड्यांवर धाडी टाकून दोघांना अटक करून नेरूळ व एपीएमसीमध्ये गुन्हे दाखल केले. याठिकाणची गांजाची रोपे व २३० ग्रॅम गांजाही जप्त केला असून इतर आरोपींचाही शोध सुरू आहे.
‘लोकमत’चे मानले आभार
नेरूळमध्ये नागरी वस्तीमध्ये गांजा विक्री होत होती. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गांजा घेण्यासाठी येथे तरुण येत होते. वारंवार भांडणे होत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच पोलिसांनी धाड टाकून हा अड्डा बंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.