विनापरवाना होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण
By Admin | Updated: October 23, 2015 00:22 IST2015-10-23T00:22:44+5:302015-10-23T00:22:44+5:30
महापालिकेच्या आवाहनाला भीक न घालता शहरात होर्डिंगबाजी सुरूच असल्याचे दिसून आले आहे. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी शुभेच्छा देणारे विनापरवाना

विनापरवाना होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण
नवी मुंबई : महापालिकेच्या आवाहनाला भीक न घालता शहरात होर्डिंगबाजी सुरूच असल्याचे दिसून आले आहे. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी शुभेच्छा देणारे विनापरवाना होर्डिंग्ज लागले आहेत. विशेष म्हणजे नवरात्रीत कोणत्याही प्रकारची होर्डिंगबाजी खपवून घेणार नाही, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र संबंधित विभागाच्या उदासीन भूमिकेमुळे होर्र्डिंगबाजांनी पुन्हा तोंड वर काढल्याचे दिसून आले आहे.
शहर विद्रूप करणाऱ्या बेकायदा होर्डिंगबाजीला आळा घालण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र स्मार्ट सिटीचे वेध लागलेल्या नवी मुंबईत मात्र या आदेशाला सपशेल हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. कारण या आदेशाची अंमलबजावणी करण्यात खुद्द प्रशासनाकडूनच हलगर्जीपणा केला जात असल्याने फुकट्या होर्डिंगबाजाचे चांगलेच फावले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या गणेशोत्सवादरम्यान, शहरात होर्डिंग, स्वागत कमानी व जाहिरात फलकांचा अतिरेक झाला होता. या पार्श्वभूमीवर नवरात्रीत अशाप्रकारच्या होर्डिंगबाजीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना आखल्या होत्या. विनापरवना होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी विभाग स्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेची परवानगी न घेता होर्डिंग किंवा जाहिरात फलक लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे सूतोवाच अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी केले होते. मात्र त्यानंतरही फुकट्या जाहिरातदारांनी आपल्या कारवाया सुरूच ठेवल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून कोपरखैरणे, वाशी, ऐरोली, घणसोली तसेच नेरूळ या भागात मोठ्याप्रमाणात विनापरवाना होर्डिंग लावण्यात आले आहेत. वाशी येथील अभ्युदय बँकेच्या समोरील चौकात तर दसऱ्याच्या शुभेच्छा देणाऱ्या होर्डिंग्जची एकच भाऊगर्दी झाल्याचे पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे कोपरखैरणेतील डी मार्ट चौकात सुध्दा मोठ्याप्रमाणात होर्डिंग उभारण्यात आले आहेत. महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडून या प्रकाराकडे सोयीस्कररीत्या डोळेझाक केली जात असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. दरम्यान, या संदर्भात अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुभाष इंगळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.