शहरातील आरोग्य यंत्रणा जगात सर्वोत्तम
By Admin | Updated: August 19, 2016 01:45 IST2016-08-19T01:45:23+5:302016-08-19T01:45:23+5:30
जागतिक मानकानुसार शहरात एक हजार रूग्णसंख्येमागे ३.५ बेड उपलब्ध असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात जागतीक स्तरावर हे प्रमाण २.७ व देशात ०.७ एवढे आहे. नवी मुंबईमध्ये हेच प्रमाण

शहरातील आरोग्य यंत्रणा जगात सर्वोत्तम
- नामदेव मोरे, नवी मुंबई
जागतिक मानकानुसार शहरात एक हजार रूग्णसंख्येमागे ३.५ बेड उपलब्ध असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात जागतीक स्तरावर हे प्रमाण २.७ व देशात ०.७ एवढे आहे. नवी मुंबईमध्ये हेच प्रमाण ३.३२ एवढे असल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने केला आहे. शहरात गरीब रूग्णांवर उपचार करण्यासाठीची यंत्रणाच नसताना पालिकेचा हा दावा हास्यास्पद ठरू लागला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्षी पर्यावरण स्थिती अहवाल सादर करत असते. २०१५ - १६ चा अहवाल शुक्रवारी सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात येणार आहे. या अहवालामध्ये शहरवासीयांची दिशाभूल करणारी माहीती दिली आहे. पालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचा दावा केला आहे. नवी मुंबईमध्ये अद्ययावत सुविधा असलेली खाजगी व सरकारी रूग्णालये आहेत. खाजगी मदतनीसांच्या सहाय्याने नवी मुंबई महापालिका रूग्णालयांमध्ये अद्ययावत सुविधा पुरविली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
गतवर्षीपेक्षा आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ झाली असल्याचा दावा केला आहे. कोणत्याही शहरातील रूग्णसेवेची उपलब्धता त्या शहरातील रूग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या पलंगांच्या संख्येवरून दर्शविली जाते. जगभरातील मानकाप्रमाणे १ हजार लोकसंख्येमागे ३.५ एवढी बेडसंख्या उपलब्ध असली पाहिजे. नवी मुंबईमध्ये ३.३ अशी जगात सर्वोत्तम आहे.
पालिकेने सर्व काही अलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न पर्यावरण अहवालात केला आहे. परंतू वास्तवामध्ये शहरवासीयांना मनपाच्या रूग्णालयांमध्ये चांगल्या सुविधा मिळतच नाहीत. पालिकेची ६ रूग्णालये सुरू असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात तुर्भे व कोपरखैरणे माताबाल रूग्णालयांची इमारत धोकादायक ठरविल्यामुळे बंद केली आहे. नेरूळ, बेलापूर व ऐरोलीमध्ये तीन नवीन रूग्णालये सुरू केली आहेत. परंतू डॉक्टर व इतर कर्मचारी नसल्याने पूर्णक्षमतेने त्यांचा वापर होत
नाही.
महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये सुपरस्पेशालिटी उपचार होत नाहीत. हिरानंदानी रूग्णालयाला कमी किमतीमध्ये जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतू त्याचा लाभ कोणत्याही गरीब रूग्णांना होत नाही. ज्याचा वशीला चांगला त्यालाच तेथे लाभ दिला जात आहे. मनपाने खाजगी रूग्णालयांच्या संख्येच्या आधारे आरोग्य व्यवस्था सक्षम असल्याचा दावा केला आहे. परंतू डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालय वगळता इतर रूग्णालयातील उपचार गरीब रूग्णांना परवडत नाहीत. अतिदक्षता विभागात रूग्णास पाठवायचे असेल तर रूग्णाला दाखल करण्यापुर्वी ३० ते ५० हजार रूपये अनामत रक्कम भरावी लागत आहे.
अपघात झाल्यास वेळेत रूग्णवाहीका उपलब्ध होत नाही. रूग्णांकडून उपचारासाठी भरमसाठ पैसे आकारले जात आहेत. छोट्या क्लिनिकमध्येही जादा फी आकारली जात आहे. शहरवासीयांना अक्षरश: लुबाडले जात असताना पालिका उत्तम आरोग्य सेवेचा दावा कशी काय करू शकते असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यावरण अहवालातून
जनतेची दिशाभूल केल्याची टीका होत आहे.
रूग्णालयात डॉक्टर नाहीत
महापालिका सर्वोत्त आरोग्य सुविधा असल्याचा दावा करत आहे. परंतू प्रत्यक्षात पालिकेच्या ऐरोली रूग्णालयात डॉक्टरच नसल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. पालिकेमध्ये कोणत्याही सुपरस्पेशालीटी अजारावर उपचार होत नाहीत. ज्या सुविधा आहेत त्याही दर्जेदार मिळत नाहीत. पालिकेकडे डॉक्टर नाहीत व खाजगी रूग्णालयांमधील उपचार परवडत नसल्याने नाईलाजाने मुंबई महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये जावे लागत आहे.
मुंढेंमुळे आला वक्तशीरपणा
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पालिका रूग्णालयांमधील बेशीस्तपणा मोडीत काढला आहे. डॉक्टर व इतर कर्मचारी वेळेवर येवू लागले आहेत. नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर व इतर कर्मचारी पहिल्यांदाच वेळेवर येवू लागले आहेत. परंतू पालिकेकडे रूग्णालयाच्या इमारती आहेत परंतू उपचार करण्यासाठी पुरेसे डॉक्टरच नाहीत. सक्षम यंत्रणा उभारण्याचे आव्हाण त्यांच्यासमोर आहे.
सिडकोचे नियंत्रण नाही
सिडकोने प्रत्येक नोडमध्ये अनेक संस्थांना अल्पदरामध्ये रूग्णालयाचे भुखंड वितरीत केले आहेत. या रूग्णालयांमध्ये गरीब रूग्णांवर उपचार करणे बंधनकारक आहे. परंतू डॉ. डी. वा.पाटील रूग्णालय वगळता इतर एकही संस्था काटेकोरपणे नियमांचे पालन करत नाही. गरीब रूग्णांवर उपचार न करणारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सिडकोकडे सक्षम यंत्रणा नाही. पालिका प्रशासनही यासाठी काहीही उपाययोजना करत नाही.
फक्त डी. वाय. पाटील चाच पर्याय
शहरवासीयांना मोफत व अल्पकिमतीमध्ये उपचार फक्त नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयात उपलब्ध आहेत. येथे येणाऱ्या रूग्णालयांना केसपेपर काढण्यासाठीही पैसे द्यावे लागत नाहीत. सर्व तपासण्या पालिकेपेक्षाही कमी दरामध्ये होत आहेत. रोज २० शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहेत. प्रसुतीविभागातील रूग्णांना सर्व सुविधा मोफत आहे. औषधांमध्येही १० टक्के सुट दिली जात आहे. एवढी सुविधा महापालिकेच्या रूग्णालयामध्येही दिली जात नसल्याने मनपापेक्षा डी. वाय. पाटीलमध्ये रूग्णांची संख्या वाढू लागली आहे.
महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. रूग्णालयाच्या भव्य वास्तू बांधल्या आहेत. परंतू प्रत्यक्षात तेथे पुरेसे डॉक्टर व इतर सुविधा नाहीत. ऐरोलीमध्ये डॉक्टर कमी असल्याने रूग्णांना वाशी प्रथम संदर्भ रूग्णालयात पाठवावे लागते.
- मनोज हळदणकर, नगरसेवक, शिवसेना