सिटी टॅक्सी रखडली
By Admin | Updated: March 2, 2016 02:25 IST2016-03-02T02:25:03+5:302016-03-02T02:25:03+5:30
प्रवासी सुरक्षा आणि भाड्यासह असलेली एकच नियमावली आणि योजना सर्व टॅक्सी सेवांसाठी ‘सिटी टॅक्सी योजने’द्वारे लागू करण्याचा निर्णय राज्याच्या परिवहन विभागाकडून घेण्यात आला होता

सिटी टॅक्सी रखडली
मुंबई : प्रवासी सुरक्षा आणि भाड्यासह असलेली एकच नियमावली आणि योजना सर्व टॅक्सी सेवांसाठी ‘सिटी टॅक्सी योजने’द्वारे लागू करण्याचा निर्णय राज्याच्या परिवहन विभागाकडून घेण्यात आला होता. त्यासाठी हरकती व सूचना परिवहनकडून मागविण्यात आल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी शासनाकडे अभिप्रायही सादर करण्यात आला. मात्र शासनाकडून यावर अद्याप निर्णयच घेण्यात आला नसल्याचे परिवहन विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
नवी दिल्लीत उबर चालकाकडून एका महिला प्रवाशावर बलात्कार केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. या घटनेचे पडसाद देशभरात उमटतानाच महाराष्ट्रातही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला, त्यानंतर ओला, उबरसह अन्य वेब बेस्ड खासगी टॅक्सी कंपन्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात सूचनाही करण्यात आल्या. मात्र यावर बराच वाद झाल्यानंतरही कायमस्वरूपी असा तोडगा काही निघाला नाही.
काही खासगी टॅक्सी सेवा अनधिकृतपणे भाडे वसूल करत असल्याचा आरोप काळ्या-पिवळ्या टॅक्सी संघटनांकडून करण्यात आला आणि त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली. एकूणच सर्व बाबी तपासल्यानंतर टॅक्सी सेवांसाठी एकच नियमावली आणि योजना आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सेवा एक समान पातळीवर आाण्यासाठी सिटी टॅक्सी योजना २0१५ आणण्यात आली. २९ सप्टेंबर २0१५ रोजी अधिसूचना काढतानाच नागरिकांना सूचना, हरकती ३१ आॅक्टोबरपर्यंत परिवहन विभागाकडे सादर करण्यास सांगितले.
या हरकती आणि सूचना एकत्रित गोळा केल्यानंतर परिवहन विभागाने साधारण दोन महिन्यांपूर्वी त्या शासनाकडे पाठविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. (प्रतिनिधी)