स्मारकासाठी नागरिक रस्त्यावर उतरतील
By Admin | Updated: August 17, 2016 03:19 IST2016-08-17T03:19:32+5:302016-08-17T03:19:32+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्याचा निर्णय रद्द करून प्रशासनाने नवी मुंबईकरांच्या भावना दुखावल्या आहेत

स्मारकासाठी नागरिक रस्त्यावर उतरतील
नवी मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्याचा निर्णय रद्द करून प्रशासनाने नवी मुंबईकरांच्या भावना दुखावल्या आहेत. १९ ऐवजी ५० कोटी खर्च झाले तरी चालतील परंतू मार्बलच लावण्यात यावे. स्मारकाच्या खर्चात कंजूशी केली तरी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत दिला आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या निर्णयाला कडाडून विरोध केला.
काँगे्रसच्या ज्येष्ठ नगरसेवीका हेमांगी सोनावणे यांनी आंबेडकर भवनच्या कामाविषयी लक्षवेधी सुचना मांडली होती. ज्या महामानवाने पुर्ण आयुष्य वंचितांच्या उद्धारासाठी खर्च केले. ज्यांनी देशाची घटना लिहीली त्यांच्या स्मारकाच्या कामात काटकसर करून पैसे वाचविल्याचे दाखविणे ही शोकांतीका आहे. डोमला मार्बल लावण्यासाठी १९ कोटीच काय ५० कोटी खर्च झाले तरी चालतील. स्मारकाच्या कामामध्ये कोणतीही तडजोड केली तरी त्याचे पडसाद सर्वत्र उमटतील. आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावून प्रशासनाने मनमानी केली तर शहरात तीव्र आंदोलन उभारले जाईल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहिली असा इशाराही त्यांनी दिला. शिवसेनेच्या संजू वाडे यांनीही आयुक्तांच्या निर्णयाविषयी तिव्र नाराजी व्यक्त केली. आयुक्तांची दुटप्पी भुमिका सहन केली जाणार नाही. त्यांना प्रसिद्धीची हाव आहे. प्रसिद्धीसाठी मार्बल न लावण्याचा निर्णय घेऊन त्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. महासभेच्या अधिकारावर गदा आणली आहे.
आयआयटीचा अहवाल महापालिकेला बंधनकारक नाही. पुर्णपणे चुकीचा निर्णय असून तो मागे घेतला नाही तर जनतेचा उद्रेक होईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. निवृत्ती जगताप, मनिषा ठाकूर, संगीता अशोक पाटील, राजू शिंदे यांनीही प्रशासनाच्या निर्णयाविषयी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक सुरज पाटील यांनीही सभागृहाचा निर्णय आयुक्त कसे बदलू शकतात असा प्रश्न उपस्थित केला. महापालिका खर्च करण्यास समर्थ आहे. प्रशासनाला खर्च वाचविण्यास कोणी सांगितले असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही मार्बलच लावले पाहिजे. खर्चामध्ये कोणतीही कंजूशी केलेली सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
भाजपाचे रामचंद्र घरत, एम. के. मढवी. द्वारकानाथ भोईर उपमहापौर अविनाश लाड यांनीही मार्बलच लावण्याचा आग्रह धरला. राष्ट्रवादीचे नगरसेवक अनंत सुतार यांनी आयुक्तांच्या कार्यशैलीचा समाचार घेतला. आयुक्तांना महापौरांना भेटण्यासाठी वेळ नाही. दुसरीकडे वॉक वुईथ कमीशनर उपक्रम राबविला जात आहे.
तो उपक्रम वॉक वुईथ नाही शॉक वुईथ असल्याची टिका केली. अधिकारी दहशतीखाली आहेत. नगरसेवकांशी फोनवरून बोलण्यासही घाबरत आहेत. आयुक्तांची नवी मुंबईच्या दादावरही दादागिरी चालू आहे. ही मनमानी कोणत्याही स्थितीमध्ये खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
(प्रतिनिधी)
डॉ. आंबेडकरांविषयी आदरच - मुंढे
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे. स्मारकाच्या खर्चात कंजूशी करण्याचा प्रश्न येत नाही. आयआयटीने तांत्रीक मुद्दे उपस्थित केले होते. मार्बल योग्य होणार नाही असा अहवाल दिल्याने तो निर्णय घेतला होता. परंतू सभागृहाचा आग्रह असेल तर त्याप्रमाणे मार्बल बसविले जाईल. आयआयटीचा अहवाल बाजूला ठेवून निर्णय घ्यायचा का अशी विचारणा केली व मार्बल बसविण्यासाठी निवीदा प्रक्रिया सुरू केली जाईल असे सांगितले.
स्मारकाचे काम तीन वर्षे रखडले
बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विषयावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांना धारेवर धरले. परंतू याविषयी स्पष्टीकरण देताना आयुक्त मुंढे यांनी सांगितले की ५ एप्रील २०११ मध्ये स्मारकाचा ठराव मंजूर केला. तेव्हा १२ कोटी ८५ लाख रूपयांच्या खर्चास मंजूरी दिली होती. यानंतर निवीदा प्रक्रिया राबविल्यानंतर तो खर्च १७ कोटी ४४ लाख झाला. पुढे तो २५ कोटीवर गेला. ६जुला स्मारकाचे भुमीपुजन करण्यात आले. काम मे २०१३ पर्यंत पुर्ण होणे आवश्यक होते. परंतू ते वेळेत पुर्ण झाले नाही. भुमीगत जलवाहिन्या बदलणे, मुळ रचनेत बदल करणे व इतर कारणांनी विलंब झाला असल्याचे निदर्शनास आणून दिले विरोधी पक्षनेते विजय चौगुले, एम. के. मढवी यांनीही आंबेडकर स्मारकाचे काम वेळेत पुर्ण करण्याकडे सत्ताधाऱ्यांनी योग्य लक्ष दिले नसल्याचे स्पष्ट केले. सभागृह नेते जयवंत सुतार यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले.
आयुक्त हुकूमशहासारखे वागत आहेत
महापौर सुधाकर सोनावणे यांनी आयुक्तांच्या कार्यशैलीवर तिव्र नाराजी व्यक्त केली. आयुक्तांनी पदभार स्विकारल्यापासून हुकुमशहाप्रमाणे वागण्यास सुरवात केलीआहे. चार महिन्यामध्ये ते महापौरांना भेटायलाही आले नाहीत. आयआयटीच्या अहवालाचा संदर्भ देवून आंबेडकर भवनला मार्बल लावण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. मुळात आयआयटीचा रिपोर्टच फेक असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. आयुक्त आल्यापासून मला भेटले नाहीतच शिवाय मी पाठविलेल्या प्रश्नांना साधे उत्तरही दिले नाही. ही मनमानी योग्य नसून मार्बल लावण्यासाठीची निवीदा प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचा आदेश दिला.
सभागृहात तणावाचे वातावरण
सभागृह नेते जयवंत सुतार यांनी एम. के. मढवी यांना वाल्या कोळीचा वाल्मीक ऋषी होतोय असे मत व्यक्त करताच मढवी यांच्या पत्नी विनया मढवी यांनी तिव्र आक्षेप घेतले. त्यांना याविषयी जाब विचारून त्यांच्या दिशेने पुढे जाण्यास सुरवात केली. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याशिवाय आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ, यशपाल ओहोळ यांनी प्रेक्षा गॅलरीत येवून आयुक्तांचा निशेध केला. बाबासाहेबांचे स्मारक उभारताना कंजूशी केल्यास त्याचे तिव्र पडसाद उमटतील असा इशाराही त्यांनी दिला.