प्लाझ्मादानासाठी पनवेलकर नागरिक गाठतात नवी मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 09:54 AM2021-05-10T09:54:38+5:302021-05-10T09:54:52+5:30

मयूर तांबडे - नवीन पनवेल : कोरोना झालेल्या रुग्णांवर प्लाझ्मा उपयुक्त ठरत आहे. मात्र, पनवेलकरांना प्लाझ्मादान करण्यासाठी थेट नवी ...

Citizens of Panvelkar reach Navi Mumbai for plasma donation | प्लाझ्मादानासाठी पनवेलकर नागरिक गाठतात नवी मुंबई

प्लाझ्मादानासाठी पनवेलकर नागरिक गाठतात नवी मुंबई

Next

मयूर तांबडे -

नवीन पनवेल
: कोरोना झालेल्या रुग्णांवर प्लाझ्मा उपयुक्त ठरत आहे. मात्र, पनवेलकरांना प्लाझ्मादान करण्यासाठी थेट नवी मुंबई गाठावी लागत आहे. पनवेलमध्ये प्लाझ्मा दान करण्याची व्यवस्था नसल्याने प्लाझ्मा दान करणाऱ्यांवर ही वेळ आली आहे. त्यामुळे पनवेलमध्ये प्लाझ्मा दान करण्याची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

वाढती रुग्णसंख्या पाहता प्लाझ्माला मोठी मागणी आहे. कोरोनातून बरे झालेले अनेक रुग्ण पुढे येऊन प्लाझ्मादान करताना दिसत आहेत. संकलित प्लाझ्मा आणि रुग्णांची संख्या यांचे व्यस्त प्रमाण झाल्यामुळे प्लाझ्मा मिळणे अवघड झाले आहे. प्लाझ्मा दान करण्याची अनेकांची इच्छा आहे. मात्र, पनवेल परिसरात  व्यवस्था नसल्याने काही जण पुढे येत नाहीत. यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

पनवेल तालुका आणि पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील मोठी आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा दान करण्याची मोहीम राबवली जात आहे, तसेच अमुक व्यक्तीला प्लाझ्माहवा आहे, असे संदेश येत असतात. मात्र, काहींना इच्छा असतानादेखील प्लाझ्मा दान करता येत नाही. त्याचे कारण म्हणजे पनवेल सोडून प्लाझ्मा दान करण्यासाठी जावे लागते. लॉकडाऊन असल्याने काही नागरिक पोलीस बंदोबस्ताला घाबरतात, तसेच काही जण पनवेलच्या बाहेर जाणे टाळतात. प्लाझ्मा दान करण्याची व्यवस्था पनवेलमध्ये झाली, तर अनेक जण इच्छुक आहेत. मात्र, पनवेलमध्ये प्लाझ्मादान करण्याची व्यवस्था नसल्याने सद्य:स्थितीत पनवेलकरांना नवी मुंबईच गाठावी लागत आहे.

दानाचे निकष
कोरोनाचा प्रादुर्भाव एखाद्या व्यक्तीस झाल्यास त्या व्यक्तीच्या शरीरात या विषाणूविरोधात प्रतिद्रव्ये (अँटिबॉडी) तयार होतात. त्या रक्तातील प्लाझ्मा या घटकात असतात. अशा प्लाझ्माला कन्व्हेलसेंट प्लाझ्मा असे म्हणतात. असा प्लाझ्मा करोनाच्या रुग्णास दिल्यास तो लवकर बरा होण्यास मदत होते. करोनाच्या आजारातून बरी झालेली व्यक्ती २८ दिवसांनंतर दाता म्हणून आपला प्लाझ्मा देऊ शकते; परंतु त्यासाठी काही निकष आहेत. १८ ते ६० वर्षे, गर्भधारणा न झालेली स्त्री, वजन किमान ५० किलो, प्लाझ्मामध्ये अँटिबॉडीज व प्रोटिन्सचे योग्य प्रमाण असणे आवश्यक आहे.  बाकीचे सर्व निकष रक्तदानासाठी असलेल्या निकषांप्रमाणेच आहेत. एकदा प्लाझ्मा दान केल्यानंतर ती व्यक्ती परत १५ दिवसांनंतर पुन्हा प्लाझ्मा दान करू शकते.

पनवेलमध्ये प्लाझ्मा बँक लवकरात लवकर सुरू होण्यासाठी काही संस्थांबरोबर चर्चा सुरू आहे. येत्या आठवडाभरात ती सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
    -प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल

यासंदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहेत. पनवेल परिसरात प्लाझ्मा बँक सुरू करण्यासाठी चर्चा सुरू आहे.
    -बाळाराम पाटील, आमदार, 
    कोकण शिक्षक मतदारसंघ

रक्तपेढीत आज प्लाझ्मा लगेच उपलब्ध होत नाही. प्लाझ्मादानासाठी पुढाकार घ्या. करोनाच्या रुग्णांना लवकर बरे होण्यासाठी मदत करा. पनवेल परिसरात प्लाझ्मादान करण्याची व्यवस्था झाली, तर मोठ्या प्रमाणात डोनर वाढतील आणि त्याचा फायदा कोरोना रुग्णांना होईल.
    - ॲड. नागेश हिरवे, पनवेल
 

Web Title: Citizens of Panvelkar reach Navi Mumbai for plasma donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.