अपयश लपविण्यासाठी सिडकोची धडपड
By Admin | Updated: May 22, 2016 02:23 IST2016-05-22T02:23:53+5:302016-05-22T02:23:53+5:30
नैना प्रकल्प अपेक्षीत गतीने पुढे जात नसल्याची खंत महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. परंतू सिडको प्रशासन मात्र या परिसरातील विकास अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याचे मान्य करत नाही

अपयश लपविण्यासाठी सिडकोची धडपड
नामदेव मोरे, नवी मुंबई
नैना प्रकल्प अपेक्षीत गतीने पुढे जात नसल्याची खंत महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. परंतू सिडको प्रशासन मात्र या परिसरातील विकास अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याचे मान्य करत नाही. रखडलेल्या विकासाचे खापर विकासकांवर फोडले जात आहे. सिडको विरोधात आवाज उठविणारेच चुकिचे काम करत असल्याचा आरोप केला जात आहे.
शहरातील बांधकाम व्यावसायीकांनी पत्रकार परिषद घेवून ठरावीक अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळेच नैना परिसरातील विकास रखडला असल्याचा आरोप केला होता. परंतू सिडकोने हे आरोप साफ फेटाळून लावले. अरिहंत बिल्डर नियम बदलण्यासाठी दबाव आणत असून त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. अरीहंत समुहाच्या छाजेर यांनी तिन वर्षापासून परवानगीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले होते. परंतू नैना चे अतिरिक्त मुख्य नियोजनकार व्ही वेणुगोपाल यांनी छाजेर हे खोटे बोलत आहेत. त्यांनी डिसेंबर २०१५ मध्ये प्रस्ताव सादर केला असल्याचे स्पष्ट केले होते. सिडकोच्या संकेतस्थळावरही अरिहंत समुहाचा प्रस्ताव १ डिसेंबर २०१५ रोजी प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यामुळे फेब्रुवारी २०१६ मध्ये प्रस्तावास परवानगी नाकारली असल्याचा उल्लेख केला आहे. परंतू सिडकोने स्वत:ची बाजू खरी असल्याचे भासविण्यासाठी चुकीचा खुलासा दिला आहे. अरिहंत समुहाने १८ मार्च २००३ मध्ये इमारतीचा आराखडा सादर केला होता. यानंतर अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला व इतर कागदपत्रेही सादर केली होती. मार्च २०१४ मध्ये ३३ लाख ३५ हजार रूपये छाननी शुल्कही भरले आहे. याची नोंद सिडको कार्यालयामध्ये असून विकासकाकडेही छायांकीत प्रती आहेत. असे असताना डिसेंबर २०१५ ला प्रस्ताव सादर केल्याचा दावा चुकिचा असल्याचे छाजेर यांनी स्पष्ट केले आहे.
नैना परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहे. या परिसराच्या विकासाची जबाबदारी सिडकोवर सोपविल्यानंतरही शेकडो इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे. परंतू सिडकोने ती बांधकामे कधीच थांबविलेली नाहीत. आत्महत्या केलेले बिल्डर राज कंधारी यांचा वाकडी येथे प्रकल्प आहे. सिडकोने वेळेत परवानगी दिली नसल्याचे त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट करताच सिडकोने यामध्ये तथ्य नाही. कंधारी यांनी परवानगी न घेताच तिन मजल्यापर्यंत बांधकाम केले असल्याचा दावा केला होता. सिडकोला हे वास्तव माहीती असताना वेळेमध्ये बांधकाम का थांबविले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तवामध्ये सिडकोविरोधात आवाज उठविणाऱ्यांच्या चुका काढून स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल नवी मुंबईतील व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली.२९ परवानग्या भूषण आहे का?
सिडकोने तिन वर्षामध्ये २९ प्रकल्पांना परवानग्या दिल्या असूनन २२२ प्रकल्पांना परवानगी नाकारली हा आकडा सिडको व बिल्डर सर्वांसाठीच भुषणावह नाही. मोठ्या प्रमाणात प्रस्तावांमध्ये त्रुटी असतील तर त्यासाठी बिल्डर, शासन व सिडको यांनी समन्वयाने मार्ग काढला पाहिजे. परंतू तसे काहीच प्रयत्न झालेले नाहीत. विकास कामे ठप्प झाली असताना ती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे रज असल्याचे मत व्यक्त होत आहे. २२१ बिल्डर गप्प का?
नैना परिसरातील २२२ बिल्डरांचे प्रस्ताव रद्द केले आहेत. परंतू कोणीही तक्रार केलेली नाही. फक्त अशोक छाजेर हेच आरोप करत असल्याची टिका सिडकोने केली आहे. छाजेर हे दबाव आणत असल्याचा आरोपही केला आहे. परंतू २२१ बिल्डरांनी आवाज उठविला नाही कारण, प्रशासनाचे दुष्मणी घेतली तर भविष्यात प्रकल्पात अडथळे वाढविण्याची त्यांना शक्यता आहे. प्रस्ताव नाकारण्यात आलेल्या बिल्डरांमध्ये सिडको विषयी असंतोष निर्माण होत आहे.