CIDCO's hundreds of old vehicles dusted off; Neglect of management, waste of lakhs of rupees | सिडकोची जुनी शेकडो वाहने धूळखात; व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, लाखो रुपयांचा चुराडा

सिडकोची जुनी शेकडो वाहने धूळखात; व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, लाखो रुपयांचा चुराडा

नवी मुंबई :  सिडकोच्या मालकीची शेकडो वाहने धूळखात पडली आहेत. सीबीडी येथील सिडको भवनच्या परिसरातील अडगळीच्या जागेवर ही वाहने ठेवण्यात आली आहेत. मागील अनेक वर्षांपासून वापराविना एकाच जागेवर पडून असलेली ही वाहने पूर्णत: मोडकळीस आली आहेत. काही वाहनांचे तर अक्षरश: भंगारात रूपांतर झाले आहे. सिडकोच्या संबंधित विभागाने सुद्धा या वाहनांकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष होत आहे.

राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोचा नावलौकिक आहे. त्यामुळे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा थाटही लौकिकाला शोभेल असाच आहे. अधिकारी वर्गाच्या दिमतीसाठी सिडकोने आपल्या ताफ्यात विविध कंपन्यांच्या महागड्या गाड्यांचा समावेश केला होता. सिडकोच्या विविध विभागांच्या कार्यालयीन कामकाजासाठी या वाहनांचा वापर केला जात असे; परंतु नियमित डागडुजी व देखभालीअभावी ही वाहने नादुस्त झाली आहेत. यात मागील काही वर्षांपासून सिडकोने नवीन वाहने खरेदी करणे बंद केले आहे.

त्याऐवजी मागील आठ वर्षांपासून भाडेतत्त्वावरील वाहनांचा वापर केला जात आहे. परिणामी, सिडकोची स्वत:च्या मालकीची शेकडो वाहने वापराविना धूळखात पडून आहेत. सिडको कार्यालयासमोरील अडगळीच्या जागेवर वर्षेनुवर्षे उभ्या असलेल्या या वाहनांच्या सभोवताली सहा ते सात फूट उंचीपर्यंत रानटी गवत व झाडे वाढली आहेत. त्या गराड्यात अनेक वाहने दिसेनाशी झाली आहेत. लाखो रुपयांची ही मालमत्ता अशा प्रकारे धूळखात पडून असल्याने संबंधित विभागाच्या कामकाजाविषयी शंका उपस्थित केली जात आहे. या वाहनांची दुरुस्ती करणे शक्य नसेल तर किमान त्यांची विल्हेवाट तरी लावावी, अशी सर्वसाधारण अपेक्षा सिडकोतील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

नियमाला बगल
सिडकोतील विभाग प्रमुख व विकास अधिकाऱ्यांना प्रति महिना अनुक्रमे ३२ हजार व २८ हजार रुपये वाहनभत्ता स्वरूपात दिला जातो. संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामासाठीच या वाहनभत्त्याचा वापर करावा, असा नियम आहे; परंतु अनेक अधिकाऱ्यांनी या नियमाला बगल दिल्याचे दिसून आले आहे.

Web Title: CIDCO's hundreds of old vehicles dusted off; Neglect of management, waste of lakhs of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.