मालमत्ता हस्तांतरणाला सिडकोची तत्त्वत: मान्यता
By Admin | Updated: July 17, 2017 01:31 IST2017-07-17T01:31:54+5:302017-07-17T01:31:54+5:30
पनवेल महापालिका क्षेत्रातील कचराप्रकरणी हेतूपुरस्सर गैरसमज पसरविले जात आहेत. महापालिका सध्या याप्रकरणी सक्षम नसली

मालमत्ता हस्तांतरणाला सिडकोची तत्त्वत: मान्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील कचराप्रकरणी हेतूपुरस्सर गैरसमज पसरविले जात आहेत. महापालिका सध्या याप्रकरणी सक्षम नसली तरी कधी ना कधी ही जबाबदारी महापालिकेला उचलावी लागणारच आहे. सिडकोने हे काम ठेकेदारी पद्धतीने राबवले असून डम्पिंग ग्राउंडही उपलब्ध करून दिले आहे. महापालिकेने निविदा काढून कचरा उचलण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करावी, असे मत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी व्यक्त केले.
पनवेल संघर्ष समितीने शुक्रवारी बेलापूर सिडको भवन येथे गगराणी यांची भेट घेवून महापालिका आणि नैना तसेच प्रकल्पग्रस्तांच्या महत्त्वाच्या दहा प्रश्नांवर सविस्तरपणे चर्चा केली. महापालिकेच्या क्षेत्रातील संपूर्ण मालमत्तेचे हस्तांतरणाची प्रक्रि या त्वरित सुरू करावी, खारघरचे मालकी हक्क महापालिकेकडे दिल्यास महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही शिष्टमंडळाने सांगितले.
यावेळी गगराणी म्हणाले, खारघर येथे मेट्रोसहित मोठे प्रकल्प सिडकोने हाती घेतले आहेत. विमानतळाचा प्रकल्प आणि पनवेल परिसरातील नैना प्रकल्प सिडको राबविणार असल्याने खारघरसंदर्भात काही अधिकार सिडकोने राखून ठेवले आहेत.
तेथील रस्ता, पाणी, घनकचरा, सांडपाण्याचा निचरा, गटारे, दिवाबत्तीची सोय सिडको पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईच्या घणसोली नोडचे २६ वर्षांनंतर महापालिकेकडे हस्तांतरण झाले. तशीच स्थिती खारघरबाबत होऊ नये अशी अपेक्षा वेळी व्यक्त करण्यात आली.