सिडकोच्या भूखंडांची कोटी-कोटींची उड्डाणे

By Admin | Updated: September 4, 2016 03:32 IST2016-09-04T03:32:01+5:302016-09-04T03:32:01+5:30

नेरुळ, खारघरपाठोपाठ सिडकोच्या घणसोली येथील भूखंडांनीही कोटींची उड्डाणे घेतली आहेत. येथील सिडकोच्या भूखंडांना रेकॉर्डब्रेक दर प्राप्त झाला आहे. निवासी व वाणिज्य वापारासाठी

CIDCO plots crores of crores flights | सिडकोच्या भूखंडांची कोटी-कोटींची उड्डाणे

सिडकोच्या भूखंडांची कोटी-कोटींची उड्डाणे

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबई

नेरुळ, खारघरपाठोपाठ सिडकोच्या घणसोली येथील भूखंडांनीही कोटींची उड्डाणे घेतली आहेत. येथील सिडकोच्या भूखंडांना रेकॉर्डब्रेक दर प्राप्त झाला आहे. निवासी व वाणिज्य वापारासाठी असलेला येथील एक भूखंड १ लाख ४१ हजार रुपये प्रति चौरस मीटर दराने विकला गेला आहे. घणसोली विभागातील आतापर्यंतचा हा सर्वोच्च दर असल्याचे बोलले जात आहे.
सिडकोने घणसोली सेक्टर १२ येथील सुमारे चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या चार भूखंडासाठी निविदा मागविल्या होत्या. या चारपैकी १0,0४१ चौरसी मीटर क्षेत्रफळाचा भूखंड हा निवासी व वाणिज्य वापरासाठी होता. या भूखंडाची सिडकोची प्रति चौरस मीटरची पायाभूत किंमत ४३,४५0 रुपये इतकी होती. त्यासाठी प्रति चौरस मीटर १ लाख ४१ हजार रुपयांचा सर्वोच्च दर मिळाला, तर निवासी वापरासाठी असलेल्या तीन भूखंडांना प्रति चौरस मीटरला सरासरी ६0 हजार रुपयांचा दर मिळाला. या चार भूखंडांच्या विक्रीतून सिडकोला तब्बल ३00 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
दोन महिन्यांपूर्वी सिडकोने नेरुळ व सानपाडा येथील वेगवेगळ्या क्षेत्रफळाच्या भूखंडांच्या विक्रीसाठी निविदा मागविल्या होत्या. त्याला तब्बल ५७ विकासकांनी प्रतिसाद दिला. त्यातील सर्वाधिक बोली लावणाऱ्या विकासकांची निविदा ग्राह्य धरण्यात आल्या. त्यानुसार, सानपाडा सेक्टर १३ येथील ३,0५0 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाला ३ लाख ३९ हजार ३३९ इतका दर मिळाला आहे. निवास्ती डेव्हलपर्सने ही बोली लावली होती. त्या पाठोपाठ याच भूखंडासाठी भूमिराज इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीने ३,३३,३३३ रुपयांची बोली लावली होती. सानपाडा सेक्टर १३ मधील ५,१२२ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या आणखी एका भूखंडाला प्रति चौरस मीटरला ३ लाख ७ हजार ५५५ दर मिळाला होता. अक्षर रिअ‍ॅलटर्स या कंपनीने हा भूखंड घेतला आहे. तीर्थ डेव्हलपर्स या कंपनीने याच भूखंडासाठी ३ लाख २000 रुपयांची बोली लावली होती. सानपाड्यापाठोपाठ नेरुळ येथील दोन भूखंडांनाही विक्रमी दर मिळाला होता. या चार भूखंडांच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत तब्बल ३१९ कोटी रुपयांची भर पडली होती. गेल्या वर्षी खारघर येथील निवासी आणि व्यावसायिक वापराच्या तीन भूखंडांनाही प्रति चौरस मीटरला सरासरी पावणे दोन लाखांचा दर मिळाला होता. या तीन भूखंडांच्या विक्रीतून सिडकोला ४३९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता, तर तत्पूर्वी काढलेल्या नेरुळ येथील भूखंडाला जवळपास अडीच लाख रुपयांचा दर प्राप्त झाला होता. त्या पाठोपाठ आता घणसोलीतील भूखंडांनाही सोन्याचे दर प्राप्त झाल्याने रियल इस्टेट क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

शहरातील जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे बांधकाम उद्योगाला घरघर लागली आहे. शहराच्या विविध भागांत सुमारे वीस हजार मालमत्ता विक्रीअभावी पडून असल्याचा दावा विकासकांनी केला आहे. सिडकोने बांधकामविषयक धोरणात सकारात्मक बदल करावेत, घरांची निर्मिती हे सिडकोचे मूळ धोरण आहे. त्यामुळे बोली पद्धतीने भूखंडांची विक्री करण्यापेक्षा घरांच्या निर्मितीवर भर द्यावा, जेणेकरून घरांच्या किमती आवाक्यात येतील, असे विकासकांचे म्हणणे आहे. असे असतानाही सिडकोने भूखंडांचे ट्रेडिंग सुरूच ठेवल्याने विकासकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट असतानाही सिडकोच्या भूखंडांना रेकॉर्ड ब्रेक दर मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: CIDCO plots crores of crores flights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.