कार बाजारसाठी सिडकोचा भूखंड हडप
By Admin | Updated: October 5, 2016 03:16 IST2016-10-05T03:16:38+5:302016-10-05T03:16:38+5:30
कोपरी येथे जुन्या वाहनांच्या खरेदी - विक्रीची मोठमोठी शोरूम्स आहेत. विशेष म्हणजे या कार बाजारच्या नावाखाली शोरूम्स चालकांनी सिडकोच्या

कार बाजारसाठी सिडकोचा भूखंड हडप
नवी मुंबई : कोपरी येथे जुन्या वाहनांच्या खरेदी - विक्रीची मोठमोठी शोरूम्स आहेत. विशेष म्हणजे या कार बाजारच्या नावाखाली शोरूम्स चालकांनी सिडकोच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या भूखंडांवर अतिक्रमण केले आहे. पामबीच मार्गालगत असलेल्या या अतिक्रमणांकडे सिडको आणि महापालिकेच्या संबंधित विभागाने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे.
पामबीच मार्गावरील कोपरी येथील या कार बाजारासंदर्भात संबंधित प्रशासनाला यापूर्वी अनेकदा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पूर्वी या कार बाजारने या परिसरातील पदपथ व्यापले होते. शोरूम्स चालकांनी विक्रीसाठी आलेल्या वाहनांचे थेट पदपथ आणि रस्त्यावर प्रदर्शन मांडले होते. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने महापालिकेने येथील कार बाजारवर धडक कारवाई केली होती. पदपथांवर वाहने उभी करता येवू नयेत, यासाठी या परिसरात टप्प्याटप्प्यावर लोखंडी रॉड लावण्यात आले होते. याचा परिणाम म्हणून पदपथ मोकळे झाले होते. असे असले तरी आता या कार बाजारने पामबीच मार्गालगतच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमण केले आहे.
स्थानिक ग्रामस्थांना हाताशी धरून शोरूम्स चालकांनी कोट्यवधींच्या भूखंडांवर अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी विक्रीसाठी आलेली जुनी वाहने उभी करण्यात आली आहेत. हा व्यवसाय चालविण्यासाठी अनेकांनी या भूखंडावर अनधिकृत बांधकाम करून छोटेखानी कार्यालय थाटले आहे. या कार्यालयाच्या परिसरात विविध कंपन्यांची जुनी वाहने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.सिडको व महापालिकेने शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात कंबर कसली आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांवर बुलडोझर फिरविला जात आहे. परंतु त्याच वेळी कार बाजारच्या नावाखाली कोपरीत अगदी दर्शनी भागात केलेले अतिक्रमण दिसत नाही का, असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)