सिडको अधिकाऱ्यांना फुटला घाम
By Admin | Updated: December 11, 2015 01:26 IST2015-12-11T01:26:00+5:302015-12-11T01:26:00+5:30
सिडको वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईमुळे रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रहिवाशांची सहानुभूती मिळविण्यासाठी राजकीय पक्ष मोर्चे,

सिडको अधिकाऱ्यांना फुटला घाम
कळंबोली : सिडको वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईमुळे रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रहिवाशांची सहानुभूती मिळविण्यासाठी राजकीय पक्ष मोर्चे, आंदोलन करीत आहेतच. बुधवारी एका अधिकाऱ्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. रहिवाशांच्या संतापामुळे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत ४ हजार ४० सदनिका आणि २ हजार ६५० सोसायट्या आहेत. कळंबोलीत पाच हजार ९०० सदनिका आणि सुमारे ११५० सोसायट्या आहेत. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून पाणीपुरवठा करण्याकरिता सिडकोला दररोज एमजेपीकडून ८५ एमएलडी पाण्याची गरज आहे. खारघर आणि कामोठे येथे सुमारे पाच हजारांच्या जवळपास ग्राहक असून त्यांना ५0 पेक्षा जास्त एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. याकरिता नवी मुंबई महापालिकेकडून ३८ एमएलडी पाणी घ्यावे लागते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने २५ टक्के पाणीकपात केली असल्याने ओढूनताणून फक्त ६० एमएलडी पाणी सिडकोला मिळत आहे. ते सुध्दा अनियमित आणि कमी दाबाने त्यामुळे नवीन पनवेल व कळंबोलीत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
नवी मुंबई महापालिकेने सुध्दा पाणीकपात केली आहे. त्यामुळे सिडकोविरोधात रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे. पाणीपुरवठा विभागावर दररोज मोर्चे व आंदोलने येत आहेत. त्यातच महानगरपालिकेचे वारे वाहू लागल्याने सर्वच राजकीय पक्ष हा मुद्दा उचलून धरू लागले आहेत.
बुधवारी आरपीआय व भारतीय जनता पक्षाने कामोठे सेक्टर ६ येथील कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चा काढून भाजपा कार्यकर्ते थांबले नाहीत, तर त्यांनी कार्यकारी अभियंता दिलीप बोकडे यांच्यावर शाई फेकली. कळंबोलीतही हीच स्थिती असून पाणीपुरवठा विभागात तक्र ारींचा ढीग पडला आहे. जोपर्यंत पाणी वितरणाबाबत योग्य नियोजन होत नाही, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना होत नाही, तोपर्यंत पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)