सिडकोला पडला आदिवासींचा विसर?

By Admin | Updated: December 21, 2015 01:36 IST2015-12-21T01:36:42+5:302015-12-21T01:36:42+5:30

सिडकोच्या दक्षिण स्मार्ट सिटी प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या खारघर शहराचा देखील यामध्ये समावेश आहे.

CIDCO lost the tribals? | सिडकोला पडला आदिवासींचा विसर?

सिडकोला पडला आदिवासींचा विसर?

वैभव गायकर, पनवेल
सिडकोच्या दक्षिण स्मार्ट सिटी प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या खारघर शहराचा देखील यामध्ये समावेश आहे. मात्र अनेक वर्षे विकासापासून दूर असलेल्या खारघरमधील आदिवासी पाड्यांचा या स्मार्ट सिटी योजनेत काहीच विचार केलेला दिसून येत नाही. येथील गावठाण तसेच आदिवासी पाडे अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. तेव्हा आमचे काय? असा प्रश्न येथील पाड्यातील आदिवासी करीत आहेत.
स्मार्ट सिटी योजनेत आदिवासी पाड्यांचा विस्तार करण्याकरिता कोणतेच धोरण राबविले गेले नाही. खारघर शहरात फणसवाडी, चाफेवाडी, हेदोरेवाडी, धामोळे, घोलवाडी, बेलपाडा वाडी, फरशीपाडा या आदिवासी पाड्यांचा समावेश आहे. सिडको येण्यापूर्वी हे आदिवासी पाडे याठिकाणी आहेत. सिडकोने याठिकाणच्या जमिनी संपादित करून मोठमोठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प आणले. टोलेजंग इमारती उभारल्या मात्र आजही याठिकाणचे आदिवासी बांधव पिण्याच्या पाण्यासाठी शहरात पायपीट करीत आहेत.
वनविभागाच्या धोरणामुळे लाकूडतोडीवर देखील बंदी आली आहे मग आम्ही आमची उपजीविका भागवावी कशी? जेवण बनविण्यासाठी लागणाऱ्या चुलीत लाकडेच नसतील तर आम्ही आमच्या चुली पेटवणार कशा असा संतप्त सवाल हे आदिवासी करीत आहेत. एकीकडे शाळा स्मार्ट होत आहेत तर या आदिवासी पाड्यामध्ये शाळांची दुरवस्था झाली आहे. रोजगार नाही, शिक्षणापासून वंचित असलेल्या या समाजामध्ये नोकरदार वर्ग कमी आहे. मोलमजुरी देखील नष्ट होत चालली आहे .
सिडकोने गाव -गावठाणासाठी २०० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे . मात्र यामध्ये आदिवासी पाडे देखील विकसित केली जाणार आहेत का? असा प्रश्न आदिवासी बांधवांमधून उपस्थित केला जात आहे.

Web Title: CIDCO lost the tribals?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.