लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: ऑनलाइन अर्ज नोंदणीला दोन दिवस शिल्लक असताना सिडकोने विविध नोडमधील गृह प्रकल्पनिहाय २६ हजार घरांच्या किमती मंगळवारी रात्री जाहीर केल्या. त्या नोडनिहाय २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत आहेत. त्यामुळे ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत असलेल्या ग्राहकांचा उशिरा का होईना संभ्रम दूर झाला आहे. मात्र, असे असले तरी सिडकोने जाहीर केलेल्या घरांच्या किमती अपेक्षेपेक्षा अधिक असल्याने सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरांवर विरजण पडल्याचा सूर ग्राहकांत उमटला.
गेल्यावर्षी ११ ऑक्टोबर रोजी सिडकोने माझे पसंतीचे सिडको घर या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता २६ हजार घरांची योजना जाहीर केली होती. यात तळोजा, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, कळंबोळी, पनवेल आणि वाशी येथील गृह प्रकल्पांतील घरांचा समावेश आहे.
ग्राहकांच्या मनात संभ्रम
घराच्या नोंदणीसाठी तब्बल तीन वेळा मुदतवाढ दिली. १० जानेवारीपर्यंत ती आहे. मात्र, या संपूर्ण कालावधीत घरांच्या किमती जाहीर केल्या नव्हत्या. नेमके कोणत्या प्रकल्पातील घरासाठी अर्ज करावा, याबाबत अनेक ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे सिडको घरांच्या किमती कधी जाहीर करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अर्ज नोंदणीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना सिडकोने घरांच्या किमती जाहीर केल्याने शेवटच्या टप्प्यात अर्ज नोंदणी करताना ग्राहकांची तारांबळ उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तळोजातील घरे स्वस्त, खारघरमधील महाग
- २६ हजार घरांपैकी सर्वाधिक घरे तळोजा नोडमध्ये आहेत. या विभागातील घरांच्या किमती २५ लाखांपासून ४६ लाखांपर्यंत ठेवल्या आहेत. सर्वांत कमी दर तळोजा सेक्टर २८ येथील घरांचे असून येथे २५ लाखांपर्यंत घर उपलब्ध केले आहे.
- तर खारघर नोडमध्ये तीन ठिकाणच्या घरांचा या योजनेत समावेश केला आहे. यापैकी सेक्टर २ ए येथील घरांच्या किमती सर्वाधिक म्हणजेच ९७ लाख इतक्या आहेत. त्यापाठोपाठ वाशीतील ट्रक टर्मिनलच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या घराची किंमत ७४ लाख इतकी आहे.
प्रकल्पनिहाय घरांच्या किमती (ईडब्ल्यूएस आणि एलआयजी)
- तळोजा सेक्टर २८ २५.१ लाख
- तळोजा सेक्टर ३९ २६.१ लाख
- तळोजा सेक्टर ३७ ३४.२ लाख
- खारघर रेल्वे स्टेशन सेक्टर २ए ९७.२ लाख
- खारघर बस डेपो ४८.३ लाख
- खारकोपर २ ए ३८.६ लाख
- खारकोपर २ बी ३८.६ लाख
- खारकोपर ईस्ट ४०.३ लाख
- कळंबोली बस डेपो ४१.९ लाख
- पनवेल बस टर्मिनल ४५.१ लाख
- मानसरोवर रेल्वे स्टेशन ४१.९ लाख
- खान्देश्वर रेल्वे स्टेशन ४६.७ लाख
- बामणडोंगरी ३१.९ लाख
- वाशी ट्रक टर्मिनल ७४.१ लाख