सिडकोला वाहनतळांचा विसर

By Admin | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:38+5:302016-01-02T08:34:38+5:30

स्मार्ट सिटी बनविण्याचा दावा करणाऱ्या सिडकोला नवी मुंबईमध्ये प्रत्येक नोडमध्ये वाहनतळ बनविण्याचा विसर पडला आहे. शहरात सद्य:स्थितीमध्ये ३ लाख ३९ हजार वाहने आहेत.

CIDCO forgot for parking | सिडकोला वाहनतळांचा विसर

सिडकोला वाहनतळांचा विसर

- प्राची सोनावणे,  नवी मुंबई
स्मार्ट सिटी बनविण्याचा दावा करणाऱ्या सिडकोला नवी मुंबईमध्ये प्रत्येक नोडमध्ये वाहनतळ बनविण्याचा विसर पडला आहे. शहरात सद्य:स्थितीमध्ये ३ लाख ३९ हजार वाहने आहेत. बाहेरून येणाऱ्या वाहनांमुळे ही संख्या चार लाखांवर जात आहे. एवढ्या वाहनांसाठी वाशीत एकच ट्रक टर्मिनल असून वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे.
दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा सिडकोने केली आहे. परंतु त्यांनी यापूर्वी निर्माण केलेल्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील त्यांचे नियोजन तीन दशकांमध्येच चुकल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. मुंबईमधील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी नवी मुंबईची निर्मिती केली. भविष्यात या शहरामध्येही वाहनांची संख्या वाढणार असल्याचा सिडकोला विसर पडला. शहरात १४,३०७ ट्रक, २,३६५ टँकर, चारचाकी मालवाहतूक वाहने ५,५३९ व तब्बल ४,१६९ ट्रेलर आहेत. या सर्व वाहनांसाठी शहरात सद्य:स्थितीमध्ये फक्त एकच ट्रक टर्मिनल आहे. यामध्ये ३ ते ४ हजार वाहनेच उभी करता येतात. त्यापेक्षा दुप्पट वाहने मुंबई बाजार समितीच्या परिसरात रोडवर उभी करावी लागत आहेत. स्कूल बसेससह इतर सर्व प्रकारची वाहने रोडवर उभी करावी लागत आहेत. रेल्वे स्टेशनसमोर वाहनतळाची सोय केली आहे. परंतु त्याव्यतिरिक्त वसाहतीमध्ये कुठेच जागा ठेवलेली नाही. यामुळे अनेक ठिकाणी मैदानांचा वापर वाहनतळ म्हणून केला जात आहे.
शहरातील बाजारपेठा, मॉल, हॉटेल व इतर वर्दळीच्या ठिकाणीही वाहने उभी करता येत नाहीत. यामुळे नागरिकांना नाइलाजाने वाहने जागा मिळेल तेथे उभी करावी लागत आहेत. या वाहनांवर वाहतूक पोलीस तत्काळ कारवाई करतात. रोज २०० ते ४०० नागरिकांना रोज रोडवर वाहने उभी केल्यामुळे दंड भरावा लागत आहे. सिडकोने केलेल्या चुका दुरुस्त करणे महापालिकेलाही शक्य झालेले नाही. महापालिकेने मागील २४ वर्षांमध्ये वाहनतळासाठी ठोस प्रयत्नच केले नाहीत. सिडकोकडून सामाजिक सुविधांसाठी भूखंड घेताना वाहनतळासाठी मात्र कधीच भूखंड मिळविला नाही. वाशी, शिवाजी चौक ते दहावी - बारावी बोर्डाच्या कार्यालयापर्यंत नाल्यावर ५ कोटी रुपये खर्च वाहनतळ उभा केला आहे. याशिवाय सीबीडी सेक्टर ११ मध्येही वाहनतळ उभारला आहे. परंतु या वाहनतळाचा वापरच होत नाही. नागरिकही बेशिस्तपणे रोडवर वाहने उभी करीत आहेत. जोपर्यंत वाहनतळावर वाहने उभी करण्याची सक्ती केली जाणार नाही तोपर्यंत अधिकृत वाहनतळाचा वापर होणार नाही. शहरात वाहतुकीचा आताच बोजवारा उडाला आहे. याबाबत योग्य नियोजन न झाल्यास भविष्यात पार्किंगवरून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे.

महापालिकेचेही दुर्लक्ष
नवी मुंबई महानगरपालिकेनेही सिडकोने केलेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. दोन वाहनतळ उभारले, परंतु त्याचा वापरच व्यवस्थित होत नाही. शहरामध्ये पार्किंग सर्वात गंभीर प्रश्न झाला असून, वाहने उभी करण्यावरून भांडणेही होऊ लागली आहेत. परंतु या समस्येकडे पालिकाही दुर्लक्षच करीत आहे.

नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या पाहता त्यानुसार ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे. शहरात पार्किंंग झोन तयार केले गेले पाहिजेत तसेच एनएमएमटी बससेवेतील सर्व्हिस रूट्स वाढविले जावेत. शहरात वाहनतळ नसल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचे पाहायला मिळते. वर्षानुवर्षे धूळखात पडलेल्या वाहनांचे निकाल लावून रस्ते मोकळे करून दिले पाहिजेत. वाहतूककोंडीची समस्या टाळण्याकरिता शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढला पाहिजे आणि त्याकरिता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणे गरजेचे आहे.
- संजय धायगुडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी.

शहरातील वाहनांची वर्षनिहाय स्थिती
वर्षट्रकट्रेलरटँकर कारमोटारसायकल इतर एकूण
२०१२१०,८७९३,१३७१,७२०७५,५२५१,०३,४३२४१,६३१२३६३२४
२०१५१४,३०७४,१६९२,३६५१,०६,४३०१,५५,८०७५६,०५०३३९१२८

Web Title: CIDCO forgot for parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.