घणसोलीच्या नियोजनात सिडको अपयशी

By Admin | Updated: July 13, 2016 02:21 IST2016-07-13T02:21:30+5:302016-07-13T02:21:30+5:30

पाच वर्षांत दक्षिण नवी मुंबई ही स्मार्ट सिटी उभारण्याची घोषणा करणाऱ्या सिडकोला २० वर्षांमध्ये घणसोली नोड विकसित करता आलेला नाही.

CIDCO fails in Ghansoli's plan | घणसोलीच्या नियोजनात सिडको अपयशी

घणसोलीच्या नियोजनात सिडको अपयशी

नामदेव मोरे,  नवी मुंबई
पाच वर्षांत दक्षिण नवी मुंबई ही स्मार्ट सिटी उभारण्याची घोषणा करणाऱ्या सिडकोला २० वर्षांमध्ये घणसोली नोड विकसित करता आलेला नाही. १ लाख नागरिकांचे वास्तव्य असलेल्या या परिसरामध्ये कोणत्याही सामाजिक सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. मैदान, उद्यान, मार्केट, करमणूक केंद्र सर्व कागदावरच आहे. शहराचे शिल्पकार म्हणून घेणाऱ्यांचे नियोजन चुकल्याचे स्पष्ट झाले असून, सिडकोने आमची फसवणूक केल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
सिडको व महापालिकेच्या हस्तांतरणावरून मतभेदामुळे एक लाख नागरिकांना समस्यांचा विळखा पडला आहे. प्रकल्पग्रस्तांप्रमाणेच सिडकोवर भरवसा ठेवून येथे घरे खरेदी करणाऱ्या नागरिकांची फसगत झाली आहे. सेक्टर १ मधील माथाडी चाळीमध्ये १७ वर्षांपूर्वी नागरिक राहण्यासाठी आले होते. सिडकोने घणसोलीमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. सर्वात प्रथम मोठ्या नाल्याला लागून वसाहती उभ्या केल्या. नागरिकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती. परंतु या नाल्याला संरक्षण भिंत बांधली जाईल. नाल्याच्या काठाचे सुशोभीकरण करून जॉगिंग ट्रॅक तयार केला जाईल. प्रत्येक सेक्टरमध्ये शाळा, मैदान, उद्यान, मार्केट, स्टॉल्स व इतर सर्व सुविधा देण्यात येण्याचे आश्वासन दिले. सेक्टर ३ मध्ये भव्य सेंट्रल पार्कसाठी जागा राखीव ठेवली होती. परंतु अद्याप तेथे उद्यानाचे काम सुरू झालेले नाही. आरोग्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. सिडकोने घणसोलीमध्ये ३० सेक्टरचे नियोजन केले होते. १० वर्षांमध्ये सर्व नोड विकसित होणे आवश्यक होते. परंतु प्रत्यक्षात १ ते ९ नोडच विकसित केले आहेत. उर्वरित २१ सेक्टरचा विकास अद्याप झालेला नाही. जे ९ सेक्टर विकसित केले तेथेही कोणत्याच सामाजिक सुविधा दिलेल्या नाहीत. यामुळे उर्वरित नोड कधी विकसित होणार, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
घणसोली सेक्टर ८ मध्ये पाँड व त्याच्या बाजूला १२ हजार चौरस मीटरचे मोकळी जागा मैदान व विरंगुळा केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आली होती. सेक्टर ९ मध्ये ११ हजार चौरस मीटर जागा मैदान व विरंगुळा केंद्रासाठी आरक्षित केली आहे. परंतु त्या जागेचा अद्याप काहीही उपयोग केलेला नाही. सेक्टर १२ व १३ मध्ये भव्य स्पोर्ट कॉम्प्लेक्सचे नियोजन केले आहे. या परिसरामध्ये तमाशा कला केंद्रासाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला आहे. परंतु सर्व सामाजिक सुविधांचे भूखंड फक्त कागदावरच राखीव ठेवले आहेत. प्रत्यक्षात एकाही भूखंडाचा अद्याप विकास केलेला नाही. ज्येष्ठ नागरिकांना सोसायटीच्या आवारामध्येच बसावे लागत आहे. एकही ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र नाही. घणसोलीवासीयांमध्ये सिडकोविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सिडको कधी सामाजिक सुविधा उपलब्ध करून देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सिडकोची स्मार्ट धूळफेक
सिडकोने दक्षिण नवी मुंबई ही पहिली स्मार्ट सिटी पाच वर्षांत उभारण्याचे व पुढील तीन वर्षांत विमानतळ उभारण्याचे आश्वासन दिले आहे. दक्षिण नवी मुंबई परिसरात एक वर्षामध्ये तब्बल ७३ उद्यान व ३३ मैदाने विकसित करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु २० वर्षांमध्ये घणसोलीवासीयांना एकही उद्यान व मैदान उपलब्ध करून दिले नसल्यामुळे सिडकोने स्मार्ट धूळफेक केल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. सिडकोने घणसोलीवासीयांवर नेहमीच अन्याय केला आहे. या ठिकाणी राहण्यासाठी आलेल्या माथाडी कामगारांना कोणत्याही सुविधा मिळालेल्या नाहीत. १५ ते १८ वर्षांपासून नागरिकांसाठी मार्केट, मैदानासह कोणत्याच सुविधा मिळालेल्या नाहीत. आम्ही वारंवार याविषयी पाठपुरावा करीत आहोत, परंतु अद्याप सिडको प्रशासन या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.
- उषा कृष्णा पाटील,
नगरसेविका, प्रभाग ३३
घरोंदा व सिम्प्लॅक्समध्ये माथाडी कामगार व मध्यमवर्गीय नागरिकांची वस्ती आहे. सिडकोने वसाहत उभारताना दिलेल्या आश्वासनांचे पालन केलेले नाही. नागरिकांसाठी एकही चांगले उद्यान नाही. ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रापासून इतर कोणत्याच सुविधा नाहीत. नोडचे हस्तांरण लवकरात लवकर व्हावे व नागरिकांना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
- दीपाली सुरेश संकपाळ,
नगरसेविका, प्रभाग ३५

Web Title: CIDCO fails in Ghansoli's plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.