सिडको वसाहतींना भंगारवाल्यांचा विळखा
By Admin | Updated: February 25, 2016 04:17 IST2016-02-25T04:17:08+5:302016-02-25T04:17:08+5:30
सिडको वसाहत आणि आजूबाजूच्या गावांमध्ये भंगारमाफियांनी बस्तान बसवले आहे. सिडको, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आणि इतर शासकीय जागेवर अतिक्रमण

सिडको वसाहतींना भंगारवाल्यांचा विळखा
पनवेल : सिडको वसाहत आणि आजूबाजूच्या गावांमध्ये भंगारमाफियांनी बस्तान बसवले आहे. सिडको, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ आणि इतर शासकीय जागेवर अतिक्रमण करण्यात आले. बेकायदा व्यवसाय करणारे हे भंगारवाले कोट्यधीश झाले आहेत. त्यांच्यावर सिडकोबरोबर इतर यंत्रणांकडून कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे पनवेल परिसराला भंगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ही मंडळी परप्रांतीय असून दबाव गट तयार करीत आहेत.
कळंबोली स्टील मार्केटमध्ये कुर्ला येथील भंगार बाजार काही वर्षांपूर्वी स्थलांतरित झाला. भंगारवाले बेकायदा व्यवसाय येथे करीत आहेत. त्यांच्यावर स्टील मार्केट कमिटीचे नियंत्रण नाही. बऱ्याच ठिकाणी अनधिकृत गाड्या तोडण्याचे अड्डे आहेत. या ठिकाणी चोरीच्या गाड्या आणल्या जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. इंजिनसह इतर पार्ट इतर गाड्यावाल्यांना विकले जातात. त्यातून रग्गड पैसे कमावले जात आहेत. स्टील मार्केटमध्ये या परिसरात सगळ्यात मोठा भंगारचा धंदा आहे. त्या ठिकाणी दररोज लाखो रुपयांची उलाढाल बेकायदा होते. हे गोरखधंदे राजरोसपणे सुरू असतानाही त्याच्यावर कारवाई होताना दिसत नाही. या व्यतिरिक्त चोरीचा माल खरेदी-विक्र ी याच ठिकाणी होते. बेकायदा गोदामात मालाची साठवणूक केली जाते. सिमरन मारुती शोरूमच्या पाठीमागे सिडकोच्या जागेवर भंगारवाल्याने बस्तान मांडले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सिडकोचा जागेचा वापर करून कोट्यवधी रुपयांची कमाई या भंगारवाल्याने केली आहे. सुकापूरची परिस्थिती फारशी वेगळी नाही, येथे रस्त्याच्याकडेला भंगारवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. द्रुतगती महामार्गाखाली एक भंगाराचा अड्डा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर त्याने दुकान थाटले आहे. तो भंगारवाला चोरीच्या गाड्या खरेदी करून त्यातून लाखो रुपये महिन्याला कमावतो.
पनवेल रेल्वेस्थानक रोडवर एकाने आपला भंगाराचा पसारा गेल्या अनेक वर्षांपासून थाटला आहे. आसुडगाव एनएच-४ बीच्या कडेला एका भंगारमाफियाने जागा व्यापली आहे. वडघरला सुध्दा सिडकोच्या जागेवर भंगाराचे मोठे दुकान आहे. याशिवाय खांदा वसाहत, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघरमध्ये लहान मोठ्या भंगारवाल्यांची कमतरता नाही. बहुतांशी ठिकाणी चोरीचे लोखंड, पत्रा, स्टील, चोरीच्या वायरमधील तांबे, पितळ, अॅल्युमि़निअम त्याचबरोबर गाड्या सुध्दा घेतल्या जातात. त्यामुळे गुन्हेगारांची एक प्रकारे साखळी या व्यवसायात काम करते. बहुतांशी भंगारवाले हे परराज्यातील आहेत. दिवसेंदिवस भंगारवाल्यांची संख्या वाढत असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. (वार्ताहर)
सिडकोच्या भूखंडावर ज्या ज्या ठिकाणी अतिक्र मण आहेत त्यांना नोटिसा बजाविण्यात येणार आहेत. आम्ही संबंधितांच्या विरोधात दोन टप्प्यात मोहीम हाती घेणार आहोत. केवळ भंगारवालेच नाही तर जिथे अतिक्रमण आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- सुभाष गोसावी, बांधकाम नियंत्रक, सिडको