मेट्रोसाठी सिडकोची चाचपणी
By Admin | Updated: September 7, 2015 04:07 IST2015-09-07T04:07:11+5:302015-09-07T04:07:11+5:30
सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रत्यक्षात हे काम पूर्ण होण्यास आणखी

मेट्रोसाठी सिडकोची चाचपणी
नवी मुंबई: सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रत्यक्षात हे काम पूर्ण होण्यास आणखी दीड दोन-अडीच वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यापूर्वीच सिडकोने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या मार्गाची चाचपणी सुरू केली आहे.
त्यासाठीचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी राईट्स
लिमिटेड या खासगी संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या मेट्रो प्रकल्पाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. बेलापूर ते खांदेश्वर दरम्यान २३.४ किमी लांबीचा हा प्रकल्प असून तो तीन टप्प्यात पूर्ण करण्याची सिडकोची योजना आहे. त्यानुसार सीबीडी ते पेंधर दरम्यानच्या ११ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे.
परंतु विविध कारणांमुळे रखडलेला हा पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी २0१७ साल उजाडण्याची शक्यता आहे. असे असले तरी सिडकोने पुढील तळोजा (एमआयडीसी) ते खांदेश्वर आणि तळोजा एमआयडीसी ते पेंधर या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांचीही कार्यवाही सुरू केली आहे.
या दोन्ही टप्प्यांचा विस्तृत कार्यअहवाल तयार करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. कार्यअहवाल तयार करण्याची जबाबदारी राईट्स लिमिटेड या खासगी कंपनीवर सोपविण्याचा निर्णय झाल्याचे समजते.
संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्राने दिली. विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्याच्या मार्गात अनेक तांत्रिक अडचणी आहेत. काही ठिकाणी भौगालिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
त्यावर तोडगा काढण्यासाठी राईट्स या संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या संस्थेकडून विस्तृत अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढच्या वर्षी दुसऱ्या टप्प्याच्या उभारणीसाठी निविदा काढण्याची सिडकोची योजना असल्याचे समजते. (प्रतिनिधी)