केमिकल कंपनीत स्फोट

By Admin | Updated: June 17, 2016 00:58 IST2016-06-17T00:58:29+5:302016-06-17T00:58:29+5:30

रिअ‍ॅक्टरचा स्फोट होवून केमिकल कंपनीत आग लागल्याची घटना रबाळे एमआयडीसीत घडली. बुधवारी रात्री घडलेल्या या दुर्घटनेत चौघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात

Chemical Company Explosion | केमिकल कंपनीत स्फोट

केमिकल कंपनीत स्फोट

नवी मुंबई : रिअ‍ॅक्टरचा स्फोट होवून केमिकल कंपनीत आग लागल्याची घटना रबाळे एमआयडीसीत घडली. बुधवारी रात्री घडलेल्या या दुर्घटनेत चौघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेवून आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
रबाळे एमआयडीसीमधील श्री गणेश इंडस्ट्रिज (डब्ल्यू २९९) कंपनीत बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. कंपनीतील रिअ‍ॅक्टरला आग लागून त्याचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. घटनेवेळी कंपनीत पाच कामगार काम करत होते. त्यापैकी चौघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संदेश भटावळ, दिलीप घाडगे, पवन सौदकर व बाळू सोनवणे अशी त्यांची नावे आहेत, तर बापू भोसले हे दुर्घटनेत थोडक्यात बचावले आहेत. रिअ‍ॅक्टर चालू असताना त्याचा स्फोट होवून आग लागल्याचे सदर दुर्घटनेत बचावलेल्या बापू भोसले यांनी सांगितले. स्फोटामुळे श्री गणेश केमिकल कंपनीच्या छताच्या पत्र्याचे तुकडे लगतच्या परिसरात पसरले होते, तर स्फोटाच्या आवाजामुळे लगतच्या काही कंपन्यांच्या काचा फुटून त्यांचेही नुकसान झाले आहे. यामुळे परिसरातील कंपन्यांमधील कामगारांचीही पळापळ झाली. डोंबिवलीची दुर्घटना ताजी असतानाच रबाळे एमआयडीसीतील कंपनीत झालेल्या या स्फोटामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिकेच्या वाशी व ऐरोली अग्निशमन दलासह एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या अथक प्रयत्नानंतर सुमारे एक तासात आग आटोक्यात आली.
श्री गणेश कंपनीच्या आवारात उघड्यावर शेडखाली मोठ्या संख्येने केमिकलने भरलेल्या ड्रमची साठवणूक केली होती. शेजारच्या कंपनीच्या सुरक्षा भिंतीचा काही भाग देखील त्याकरिता वापरण्यात आलेला होता. कंपनीकडून झालेला हा हलगर्जीपणा मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकला असता. हीच परिस्थिती एमआयडीसीतील बहुतांश कंपन्यांच्या बाहेर पहायला मिळत आहे. सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून उघड्यावर केमिकलची साठवणूक केली जात असतानाही संबंधित प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

शिरढोणमधील जुन्या टायर गोदामाला आग
मुंबई-गोवा महामार्गालगत चिंचवण गावाजवळील शिरढोण पाडा येथे मोकळ्या भूखंडावर असलेल्या टायरच्या गोदामाला गुरुवारी पहाटे आग लागली. त्यामध्ये हजारो टायर जळून खाक झाले. अग्निशमन दलातील जवानांच्या प्रयत्नामुळे आजूबाजूच्या गोदामापर्यंत आगीचे लोण पसरले नाही. मुंबई-गोवा महामार्गालगत साईकृपा हॉटेलच्या समोर मोकळा भूखंड आहे.
गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास या टायर्सला अचानक आग लागली. बाजूला जॅकवार कंपनी, धान्य गोदाम, एटीएम दुरुस्ती केंद्र तसेच कंटेनर यार्ड आहे. कळंबोली, नवीन पनवेल, वाशी, बेलापूर, पनवेल पालिका आणि जेडब्लूआर असे एकूण सहा अग्निशमन बंब मागविले होते.
आगीची इतकी तीव्रता होती की, महामार्गावरून जाताना झळा लागत होत्या.पाण्याची तीव्र टंचाईमुळे आग विझविण्याकरिता थेट पनवेलहून पाणी आणावे लागले. या मोकळ्या भूखंडावर टायर ठेवण्यासाठी परवानगी होती का, याबाबत चौकशी करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Chemical Company Explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.