नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
By Admin | Updated: December 26, 2014 00:08 IST2014-12-26T00:08:49+5:302014-12-26T00:08:49+5:30
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक केल्याच्या दोन घटना कळंबोली व वाशीमध्ये घडल्या. याप्रकरणी संबंधित दलालांविरोधात

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
नवी मुंबई : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक केल्याच्या दोन घटना कळंबोली व वाशीमध्ये घडल्या. याप्रकरणी संबंधित दलालांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कामोठेमध्ये राहणाऱ्या दिनकर चोपडे यांच्या मुलास नरेश सुर्वे नावाच्या व्यक्तीने मंत्रालयामध्ये महसूल विभागात अधिकारी असल्याचे सांगितले होते. मंत्रालयामध्ये चांगली ओळख आहे. तुमच्या मुलांना नोकरी लावतो असे सांगितले होते. चोपडे यांनी मुलगा व पुतण्याला नोकरी लागावी यासाठी जून ते डिसेंबरपर्यंत २०१४ दरम्यान ६ लाख रुपये दिले. परंतु त्यांच्या मुलांना नोकरी लावण्यात आली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही काहीच उपयोग झाला नाही. नोकरीही नाही व पैसेही परत मिळाले नाहीत यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला.
वाशीमध्येही एका तरुणाची फसवणूक झाली आहे. खारघरमधील रहिवासी असलेल्या मोहम्मद गथासुहीन याला हावरे बिझनेस पार्कमध्ये कार्यालय थाटलेल्या पवनकुमार याने कुवेतमध्ये ज्युनियर मेकॅनिकची नोकरी लावतो, असे सांगितले होते. यासाठी त्याच्याकडून २४ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान ३९ हजार रुपये घेतले होते. परंतु प्रत्यक्षात नोकरी लावली नाही व पैसेही परत दिले नाहीत, त्यामुळे संबंधिताविरोधात वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)