फसवणूक करणाऱ्या बिल्डरांच्या संपत्तीवर येणार टाच !
By Admin | Updated: May 14, 2016 01:05 IST2016-05-14T01:05:00+5:302016-05-14T01:05:00+5:30
पनवेल तालुक्यात स्वस्तात घर बांधून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात तालुका पोलीस ठाणे येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते

फसवणूक करणाऱ्या बिल्डरांच्या संपत्तीवर येणार टाच !
पनवेल : पनवेल तालुक्यात स्वस्तात घर बांधून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात तालुका पोलीस ठाणे येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बिल्डरांच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवी मुंबई परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.
पनवेल परिसरात स्वस्त घरांचा भूलभुलैया दाखवून अनेकांकडून लाखो रु पये उकळून बिल्डर पसार झाले आहेत. अनेक ठिकाणी जागा एन.ए. केलेली नसताना देखील अनधिकृत इमारती उभारल्या गेल्या आहेत. तर काही ठिकाणी एकाच रूमवर चार ते पाच ग्राहकांचे बुकिंग उचलल्या गेले आहेत. बुकिंग घेऊन दोन ते तीन वर्षे उलटून गेली तरी देखील बांधकामांचा पत्ता नाही. त्यामुळे ६६६ ग्राहकांनी अद्यापपर्यंत १७ बिल्डरांविरोधात तब्बल १४ कोटी ५५ लाख १५ हजार ८४८ हून अधिक रुपयांची फसवणूक केली असल्याची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात आहे. २0१६ साल उजाडल्यापासून जवळपास १0 हून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मोरया होम्स, हिंदुस्थान होम, स्वप्ननगरी, रियल इंडिया होम्स , अम्रीथ डेव्हलपर्स, तिरुपती बालाजी, स्वप्नपूर्ती होम्स, बजेट होम आदी बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी बैठ्या चाळी तसेच इमारतीच्या रूमचे ठिकठिकाणी होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावून जाहिरातबाजीही केली होती. त्यामध्ये विमानतळ, रेल्वेस्थानक, बसस्थानक जवळ असल्याचे दाखले देत ग्राहकांना भुलवले जात असे. साइट सुरु करतो असे सांगून हजारो ग्राहकांकडून करोडो रुपयांची माया जमा केली मात्र अद्यापपर्यंत या साइटवर कोणत्याही प्रकारचे काम पूर्ण करण्यात आलेले नसल्याच्या तक्र ारी ग्राहकांनी मांडल्या. या सर्व बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांचे पैसे घेऊन अन्य ठिकाणी जागा घेतल्या आहेत, मात्र ग्राहकांना घरे दिली नाहीत. (वार्ताहर)