चाकरमानी मतदारांना थांबविण्याचे आव्हान
By Admin | Updated: April 21, 2017 00:19 IST2017-04-21T00:19:12+5:302017-04-21T00:19:12+5:30
पनवेल महानगरपालिकेची निवडणूक २४ मे रोजी घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर करताच इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे

चाकरमानी मतदारांना थांबविण्याचे आव्हान
नितीन देशमुख , पनवेल
पनवेल महानगरपालिकेची निवडणूक २४ मे रोजी घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर करताच इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. ऐन सुटीत निवडणूक जाहीर करण्यात आल्याने मतदान कमी झाले तर त्याचा फायदा कोणाला होईल, याची गणिते मांडण्यात येत आहेत.
उन्हाळी सुटीसाठी गावी गेलेल्या मतदारांना कसे परत बोलवायचे, तसेच मे महिन्यात गावी जाणाऱ्या मतदारांना कसे थांबवायचे, यासाठी इच्छुकांकडून मतदारांची मनधरणी करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पनवेल महापालिका जाहीर झाल्यानंतर होणाऱ्या पहिल्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षाकडे अनेक इच्छुक उमेदवारांनी तिकीट मिळण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. स्थानिक पक्ष प्रमुखांच्या उपस्थितीत विविध कार्यक्र म घेण्याची चढाओढ सहा महिने सुरू होती. सण उत्सवात आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप आदी समाजोपयोगी उपक्रम सर्वत्र इच्छुकांनी राबवले. मात्र ज्या निवडणुकीची उमेदवार आतुरतेने वाट पहात होते ती पनवेल महापालिकेची निवडणूक ऐन सुटीत जाहीर झाली आहे.
सध्या शाळा-महाविद्यालयांना सुटी लागल्याने चाकरमानी गावी रवाना झाले आहेत, तर काहींचे आगाऊ बुकिंग झाले आहे. त्यामुळे मतदारांना निवडणुकांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी उमेदवारांकडून विविध शक्कल लढवल्या जात आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी तर प्रभागनिहाय सर्वेक्षण केल्याने मतदारांचे नाव, गाव, संपर्क क्रमांक मिळवला आहे.