ठाणे-बेलापूर रोडवर चक्का जाम
By Admin | Updated: May 29, 2017 06:39 IST2017-05-29T06:39:35+5:302017-05-29T06:39:35+5:30
ठाणे-बेलापूर रोडवर तुर्भे नाका ते तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे

ठाणे-बेलापूर रोडवर चक्का जाम
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर रोडवर तुर्भे नाका ते तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. वाहनांच्या एक ते दीड किलोमीटरच्या रांगा लागत असून यामुळे प्रवासी व परिसरातील नागरिक त्रस्त झाल ेआहेत.
नवी मुंबईमधील प्रमुख रोडमध्ये ठाणे - बेलापूरचाही समावेश आहे. या रोडवरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने १०० कोटी रूपये खर्च करून काँक्रीटीकरण केले आहे. याशिवाय एमएमआरडीएनेही अनेक ठिकाणी उड्डाणपुलांचे काम सुरू केले आहे. यानंतरही तुर्भे नाका व तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये प्रत्येक शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.
चक्काजाममुळे नागरिकांना एकाच ठिकाणी अडकून रहावे लागत आहे. तुर्भे नाका येथील शिवसेना शाखा प्रमुख राजू शेख व दत्ता होवाळ यांनी वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे.
या परिसरात वाहतूक पोलिसांची चौकी आहे. परंतु पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्याकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल नागरी नाराजी व्यक्त करू लागले असून येथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी
केली आहे.