गणेशोत्सव मंडपात लागले सीसीटीव्ही
By Admin | Updated: September 24, 2015 00:39 IST2015-09-24T00:39:45+5:302015-09-24T00:39:45+5:30
सुरक्षिततेबाबत सूचना करूनही त्याचे उल्लंघन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांचा स्टिंग आॅपरेशनद्वारे पर्दाफाश केल्यानंतर शहरातील अनेक मंडळे खडबडून जागी झाली आहेत.

गणेशोत्सव मंडपात लागले सीसीटीव्ही
नवी मुंबई : सुरक्षिततेबाबत सूचना करूनही त्याचे उल्लंघन करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांचा स्टिंग आॅपरेशनद्वारे पर्दाफाश केल्यानंतर शहरातील अनेक मंडळे खडबडून जागी झाली आहेत. यासंदर्भात पोलिसांनी घेतलेल्या झाडाझडतीनंतर अनेक मंडळांनी उत्सव काळात सीसीटीव्ही व सुरक्षेच्या इतर उपाययोजनांवर भर दिल्याचे दिसून आले आहे.
गणेशोत्सव काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. मात्र पोलिसांच्या आवाहनानंतरही अनेक मंडळांनी गांभीर्य न घेत गणेशमूर्तींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा दाखवला आहे. परिणामी अशा मंडळांतील गणेशमूर्तींची सुरक्षा धोक्यात असून त्याठिकाणी धार्मिक तेढ करणारे प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकमतने सार्वजनिक मंडळांचे स्टिंग आॅपरेशन करून पर्दाफाश केला होता. याची दखल घेत परिमंडळ उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सार्वजनिक मंडळाच्या सुरक्षेची चाचपणी करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार पाहणी करुन सुरक्षेत निष्काळजीपणा करणाऱ्या मंडळांना खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांनी केल्या होत्या. पाहणीमध्ये संपूर्ण शहरात मोठी मंडळे वगळता इतर बहुतांश मंडळात सीसीटीव्ही तसेच स्वयंसेवक नेमलेले नसल्याचे समोर आले होते. अशा मंडळांनी लोकमतच्या वृत्ताची दखल घेत सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. घणसोलीच्या शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळाने उत्सवाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत. यापूर्वी त्यांनी उत्सवाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नव्हते. मात्र लोकमतच्या वृत्तानंतर सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेवून उत्सवाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवल्याचे मंडळाचे संस्थापक कृष्णा पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)