रोहा शहरावर सीसीटीव्हीची नजर
By Admin | Updated: October 5, 2016 03:08 IST2016-10-05T03:08:54+5:302016-10-05T03:08:54+5:30
मागील दोन वर्षांत रोहे शहर व लगतच्या परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, धाडसी दरोडा, चोरी, मारामारी, लैंगिक अत्याचार आदी गैरप्रकार मोठ्या संख्येने घडले आहेत.

रोहा शहरावर सीसीटीव्हीची नजर
रोहा : मागील दोन वर्षांत रोहे शहर व लगतच्या परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, धाडसी दरोडा, चोरी, मारामारी, लैंगिक अत्याचार आदी गैरप्रकार मोठ्या संख्येने घडले आहेत. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले होते. काही ठिकाणी तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. विविध प्रकरणातील आरोपींचा शोध लावण्यासाठी पोलिसांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी रोहा पोलीस ठाणे, रोहा नगर परिषद, श्री धावीर मंदिर ट्रस्ट व रेल्वे स्टेशन परिसरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या विशेष फंडातून रोहे नगरपरिषद व पोलीस ठाणे परिसराकरिता २० लाख रु. निधीची तरतूद करण्यात आली. नगर पालिका चौक, दमखाडी, तीनबत्ती नाका, मारुती चौक, अष्टमी नाका, पोलीस स्टेशन रोड आदी परिसरात होत असल्याने सर्व प्रकार या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत आहे. आ.सुनील तटकरे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ नुकताच झाला आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीला ब्रेक लावण्यासाठी नगरपरिषद व पोलीस प्रशासन हातात हात घालून काम करीत आहे. मध्यंतरी कोकण रेल्वेत प्रवासी झोपले असता त्यांच्याजवळील किमती दागिने, मोबाइल व अन्य वस्तू लंपास करणे, रेल्वे पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणे, रेल्वेत बसलेल्या प्रवाशांना खाद्य पदार्थातून गुंगीचे औषध टाकून लुटणे असे प्रकार अनेकदा घडले आहेत. या घटनेमुळे रेल्वे पोलीस व प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्टेशन परिसरात तिसऱ्या डोळ्याचा बंदोबस्त केला आहे. यातून गुन्हेगारीला चाप बसणार आहे. मागील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावले आहेत. (वार्ताहर)