खारघरमधील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित
By Admin | Updated: August 9, 2016 02:33 IST2016-08-09T02:33:04+5:302016-08-09T02:33:04+5:30
स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच दक्षिण नवी मुंबई परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे.

खारघरमधील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित
नवी मुंबई : स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच दक्षिण नवी मुंबई परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात खारघर परिसरात १२४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे प्रत्यक्ष कार्यान्वित झाले असून त्याच्या नियंत्रण कक्षाचे सोमवारी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
दक्षिण नवी मुंबई क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थापन, वाढत्या गुन्हेगाराला प्रतिबंध घालणे, एकूणच शहराची व शहरवासीयांची सर्वांगीण सुरक्षा राखण्याच्या दृष्टीने सिडकोने १0८ कोटी ६५ लाख रुपयांचा सीसीटीव्ही प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत शहरातील प्रमुख व सार्वजनिक ठिकाणे, चौक, बाजारपेठा, बस डेपो, शाळा व महाविद्यालये आदी परिसरावर सीसीटीव्हीचा वॉच ठेवणार आहेत. खारघर, उरण, पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, उलवे आदी सिडको क्षेत्रात २0१९ पर्यंत एकूण ५७२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना आहे. त्यापैकी १२४ कॅमेरे खारघरमध्ये बसविले आहेत. त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत गगराणी यांनी सोमवारी केला. नवी मुंबई पोलीस विभागाच्या समन्वयाने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पाचा एक भाग म्हणूनच सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याची माहिती गगराणी यांनी दिली. यामुळे सिडकोच्या प्रति असलेली विश्वासार्हता वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा, राजेंद्र चव्हाण, मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त मधुकर पांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)