कपाटबंद फाईलची चौकशी
By Admin | Updated: October 6, 2016 03:10 IST2016-10-06T03:10:05+5:302016-10-06T03:10:05+5:30
पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातंर्गत माहेरचा वसा योजनेत बाळंतीणींना दिलेला पौष्टिक आहार निकृष्ट असल्याचे उघड झाले

कपाटबंद फाईलची चौकशी
सदानंद नाईक , उल्हासनगर
पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातंर्गत माहेरचा वसा योजनेत बाळंतीणींना दिलेला पौष्टिक आहार निकृष्ट असल्याचे उघड झाले. याप्रकरणी तत्कालीन आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतरही फाईल कपाट बंद असल्याची बातमी ‘लोकमत’च्या बुधवारच्या ‘हॅलो ठाणे’ मध्ये प्रसिध्द होताच प्रशाससनात खळबळ उडाली. बुधवारपासून या फाईलची चौकशी सुरू झाली असून १५ सप्टेंबर पर्यंत अहवाल सादर करणार असल्याची माहिती चौकशी अधिकारी ए आय जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
उल्हासनगर महापालिका महिला व बालकल्याण विभागाच्या तात्कालीन सभापती समिधा कोरडे यांनी माहेरचा वसा योजने अंतर्गत बाळंतीण व लहान मुलांना पौष्टिक आहारासह किड्स देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. बाळंतीणींना काजू,् बदाम, साखर, रवा, तूप या वस्तूची पिशवी व लहान मुलांसाठी आरोग्य किड्सचे वाटप जुलैच्या पहिल्या आठवडयात महापौर अपेक्षा पाटील, उपमहापौर पंचशिला पवार, तत्कालीन सभापती समिधा कोरडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. तसेच पौष्टिक आहाराच्या पिशव्या मध्यवर्ती व सरकारी प्रसूतीगृहात दिले होते.
शहरातील सरकारी प्रसूतीगृहात ठेवलेल्या पौष्टिक आहाराच्या पिशव्यातील वस्तू निकृष्ट असून किडे असल्याच्या तक्रारी बाळंतीणींनी रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. नसिसिंह इंगळे यांच्याकडे केल्या होत्या. डॉ इंगळे यांनी निकृष्ठ आहार हा बाळंतीण व मुलाच्या आरोग्यास घातक होऊ शकतो हे लक्षात आल्यावर त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती देऊन साहित्य घेऊन जाण्याचे सांगितले. दरम्यान, ही माहिती मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष सचिन कदम, शहराध्यक्ष प्रदीप गोडसे, संजय घुगे, बंडू देशमुख, मनोश शेलार, कल्पेश माने, मनुमुद्दीत शेख यांच्यासह कार्यकर्त्यांना मिळाल्यावर त्यांनी रूग्णालयात जाऊन तात्कालिन आयुक्त हिरे यांना जाब विचारून कारवाईची मागणी केली होती.