अतिक्रमणाविरोधात मोहीम

By Admin | Updated: September 2, 2016 03:56 IST2016-09-02T03:56:38+5:302016-09-02T03:56:38+5:30

अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सिडकोने पुन्हा एकदा कंबर असली आहे. जानेवारी २0१६ नंतर उभारलेल्या बेकायदा बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Campaign against encroachment | अतिक्रमणाविरोधात मोहीम

अतिक्रमणाविरोधात मोहीम

नवी मुंबई : अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सिडकोने पुन्हा एकदा कंबर असली आहे. जानेवारी २0१६ नंतर उभारलेल्या बेकायदा बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात ठाणे व रायगड जिल्ह्यातील एकूण १२७ बांधकामांचा समावेश आहे. जाहीर केलेल्या यादीतील बेकायदा बांधकामांशी कोणीही कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये, असे आवाहन सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाकडून करण्यात आले आहे.
सिडकोने न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात गेल्या वर्षीपासून कारवाई मोहीम छेडली आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात प्रकल्पग्रस्तांच्या प्रखर विरोधामुळे सिडकोला आपली ही मोहीम काहीशी आवरती घ्यावी लागली होती. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून ही मोहीम जवळजवळ ठप्प झाली होती. परंतु आता पुन्हा बेकायदा बांधकामांवर सिडकोने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील अर्थात महापालिका कार्यक्षेत्रातील ११४ तर रायगड जिल्ह्यातील १७ बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या बांधकामांची रीतसर यादी वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आली असून नागरिकांनी संबंधित बांधकामांशी कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे सिडकोने जाहीर केलेल्या यादीत सर्व छोट्या स्वरूपाची बांधकामे आहेत. बड्या बांधकामांकडे सोयीस्कररीत्या डोळेझाक केली जात असल्याचा आरोप होत आहे. कारण आजही गाव-गावठाणात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. कारवाईच्या धसक्याने मध्यंतरी थांबलेल्या बेकायदा टॉवर्सचे बांधकाम आजही राजरोसपणे सुरू आहे. जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली, गोठीवली, सानपाडा आदी ठिकाणी फिफ्टी-फिफ्टीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. जुहू गावात एका टोलेजंग इमारतीचे काम सुरू आहे. गेल्या महिन्यात या इमारतीवरून पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. परंतु हे प्रकरण दडपल्याची चर्चा आहे.
कोपरखैरणेत महापालिका विभाग कार्यालयाला खेटून दोन बेकायदा इमारती उभारल्या आहेत. कारवाईच्या धसक्याने इमारतीचे बाह्यकाम उरकण्यात आले आहे. सध्या अंतर्गत कामे सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेचे कार्यालय असलेल्या याच इमारतीत सिडकोचे विभाग कार्यालयसुध्दा आहे. त्यानंतरसुध्दा या इमारतींचे काम राजरोसपणे सुरू असल्याचे पाहावयास मिळते. एकूणच या सर्व प्रकारामुळे सिडको आणि महापालिकेच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Campaign against encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.