व्यावसायिकाला लुटणारी टोळी अटकेत
By Admin | Updated: October 31, 2015 00:18 IST2015-10-31T00:18:42+5:302015-10-31T00:18:42+5:30
हॉटेल व्यावसायिकावर चाकू हल्ला करून लुटणाऱ्या चौघांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपासून या व्यावसायिकांना घरापर्यंत सोडणाऱ्या रिक्षा चालकानेच मित्रांच्या मदतीने

व्यावसायिकाला लुटणारी टोळी अटकेत
नवी मुंबई : हॉटेल व्यावसायिकावर चाकू हल्ला करून लुटणाऱ्या चौघांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपासून या व्यावसायिकांना घरापर्यंत सोडणाऱ्या रिक्षा चालकानेच मित्रांच्या मदतीने हा कट रचला होता. यामध्ये ४३ हजार रुपयांची रक्कम चोरीला गेली होती.ऐरोली सेक्टर १६ येथे राहणाऱ्या यादव देवाडिया (५९) यांच्यासोबत हा प्रकार घडला होता. त्यांचे घणसोली येथे हॉटेल असून रोज रात्री हॉटेल बंद केल्यानंतर ते रिक्षाने घरी जायचे. यानुसार काही दिवसांपासून ते एकाच रिक्षाने घणसोली ते ऐरोलीपर्यंतचा प्रवास करत होते. बुधवारी रात्री नेहमीच्या रिक्षाने घरी जात असताना सहप्रवासी म्हणून बसलेल्या तिघांनी त्यांना लुटले होते.
या तिघांनी देवाडिया यांच्यावर चाकू हल्ला करून ४३ हजार रुपयांची रोख रक्कम लुटली होती. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाअंती पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यामध्ये रिक्षाचालकाचाही समावेश असून त्याने गुन्ह्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाल्याचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.
सूरज पवार (२८) असे रिक्षा चालकाचे नाव असून कैलास डिडोळे (१९), मोहन थापा (२०) व राज अधिकारी (१९) अशी अन्य आरोपींची नावे आहेत. सर्व जण घणसोलीतील रहिवाशी आहेत. सूरज परिसरात भाड्याची रिक्षा चालवतो.
त्याने देवाडिया यांना सलग
काही दिवस रिक्षातून ऐरोलीपर्यंत सोडले होते. यानुसार त्याने मित्रांच्या मदतीने त्यांना लुटण्याचा कट रचला होता.
घटनेच्या दिवशी तो देवाडिया यांना घेवून जात असताना घणसोली रेल्वे पुलालगत थांबलेले त्याचे तीन साथीदार प्रवासी म्हणून रिक्षात बसले. यानंतर ऐरोलीच्या पटनीमार्गे युरो स्कूलजवळ त्यांनी देवाडिया यांच्या गळ्यावर चाकूने जखम करून त्यांच्याकडील पैशाची बॅग
पळवली. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच
वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत काटकर व उपनिरीक्षक पिंपळे यांच्या
पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान रिक्षा चालक सूरज याच्या वागण्यावर त्यांना संशय आला. अधिक तपासात त्याचा मित्र कैलास डिडोळे याच्याविषयीची माहिती मिळाली. (प्रतिनिधी)