अग्निशमन जवानांच्या इमारतीमध्ये चोरी; बंद घरातील दागिने पळविले
By नामदेव मोरे | Updated: January 15, 2024 17:36 IST2024-01-15T17:35:53+5:302024-01-15T17:36:01+5:30
चोरट्याने शेजाऱ्यांच्या घराला लावली कडी

अग्निशमन जवानांच्या इमारतीमध्ये चोरी; बंद घरातील दागिने पळविले
नवी मुंबई : नवीन पनवेल अग्नीशमन कॉलीमधील इमारतीमध्ये रविवारी पहाटे चोरी झाली. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आतमधील दागिने पळवून नेले असून चोरी करण्यापुर्वी शेजारील सर्व घराला बाहेरून कडी लावून घेतली होती.
अग्निशमन दलाच्या इमारतीमध्ये राहणारे फायरमन जीतेंद्र पाटील यांच्या घराचा दरवाजा पहाटे चोरट्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला. आवाजामुळे जागे झालेल्या पाटील यांनी बाहेर येवून पाहताच चोरट्याने तेथून पळ काढला. त्यांनी इमारतीच्या खाली येवून सुरक्षा रक्षकाला विचारले पण त्याने चोरट्याने पाहिले नव्हते. तेवढ्यात इमारतीमधील इतर सहकाऱ्यांचे त्यांच्या मोबाईलवर फोन येण्यास सुरुवात झाली. कोणीतरी बाहेरून दरवाजाला कडी लावली असल्याचे सांगितले. पाटील यांनी सर्व दरवाजांची कडी उघडून सहकाऱ्यांना बाहेर घेतले.
तळमजल्यावरील राजेंद्र फरांदे हे कामानिमीत्त गावी सातारा येथे गेले असून त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याचे दिसले. चोरट्यांनी घरातून सोन्याचे मंगळसुत्र, फुलांची जोडी व १८ हजार रूपये रोख रक्कम असा ७० हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेला आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.