भाज्यांच्या दरवाढीमुळे कोलमडले गृहिणींचे बजेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2016 01:57 IST2016-07-16T01:57:40+5:302016-07-16T01:57:40+5:30
गेल्या पंधरवड्यात झालेल्या दमदार अतिवृष्टीमुळे स्थानिक भाज्याही बाजारपेठेत कमी येत आहेत. भाज्यांचा भाव प्रतिकिलो १२० ते १४० रूपये आहे. भाज्यांची आवक कमी आहे

भाज्यांच्या दरवाढीमुळे कोलमडले गृहिणींचे बजेट
पेण : गेल्या पंधरवड्यात झालेल्या दमदार अतिवृष्टीमुळे स्थानिक भाज्याही बाजारपेठेत कमी येत आहेत. भाज्यांचा भाव प्रतिकिलो १२० ते १४० रूपये आहे. भाज्यांची आवक कमी आहे हे पाहून स्थानिक भाज्या कडाडल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील वाद आणि सरकारचे धोरण यामुळे मंगळवारपासूनच भाज्यांचा भाववाढीचा निर्देशांक वधारला आहे. सामान्यांना न परवडणाऱ्या या भाज्यांचे भाव शंभरीवर गेले आहे.
सध्या कोणत्याही प्रकारची भाजी १२० ते १४० रूपये प्रतिकिलो दराने विक्री होत असल्याने भाज्यांची खरेदी करताना नाके मुरडली जातात. पाच ते दहा रूपयांमध्ये मिळणारा दुधी भोपळा ३० ते ४० रूपयांवर गेलाय. आदिवासी समाजबांधवही चढ्या भावानेच भाजी विकतात. अचानक भाववाढ झाल्याने एरवी स्वस्त मिळणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाज्यांची आवक थांबवल्याने भाज्या प्रचंड महाग झाल्यास हा पेण बाजारपेठेतला विक्रमच म्हणावा लागेल. स्थानिक बाळगंगा परिसर व पाबळ खोरे तसेच पेण पूर्व भागातून येणाऱ्या भाज्यांवर पावसाची वक्रदृष्टी झाल्याने भाज्यांची आवक मंदावली. (वार्ताहर)