नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार, निवडणुकीमुळे सर्वपक्षीयांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 06:25 IST2021-02-18T06:24:55+5:302021-02-18T06:25:19+5:30
Navi Mumbai Municipal Corporation : नवी मुंबई पालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९१ ते १९९५ दरम्यान महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती होती. सुरुवातीचे अंदाजपत्रक प्रशासकांनीच सादर केले होते.

नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार, निवडणुकीमुळे सर्वपक्षीयांचे लक्ष
नवी मुंबई : महानगरपालिकेचा महानगरपालिकेचा २०२१ - २२ चा अर्थसंकल्प आयुक्त अभिजित बांगर गुरुवारी सादर करणार आहेत. १९९५ नंतर तब्बल २५ वर्षांनी प्रशासक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचेही अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई पालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९१ ते १९९५ दरम्यान महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती होती. सुरुवातीचे अंदाजपत्रक प्रशासकांनीच सादर केले होते. पहिली निवडणूक झाल्यानंतर २५ वर्षे आयुक्त स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक सादर करत व स्थायी समिती सभापती अर्थसंकल्प सादर करत. गतवर्षी काेरोनामुळे निवडणुका न झाल्यामुळे मेपासून महानगरपालिकेवर पुन्हा प्रशासकाची नियुक्ती केली असून या वर्षीचा अर्थसंकल्प आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रशासक म्हणून तयार केला आहे. गतवर्षी आयुक्तांनी ३,८५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर केला होता. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेने त्यामध्ये वाढ करून तब्बल ४६०० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास अंतिम मंजुरी दिली होती. वर्षभर कोरोनामुळे अपेक्षित महसूल प्राप्त झाला नव्हता. यामुळे वर्षभरात अर्थसंकल्पातील नक्की किती उद्दिष्ट साध्य झाले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पालिकेने २० वर्षांत कोणतीही करवाढ केलेली नाही. या वर्षी अर्थसंकल्पातही कोणतीच करवाढ नसणार अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्षात आयुक्त कोणत्या नवीन योजना जाहीर करणार याविषयी उत्सुकता लागली आहे. निवडणुका जवळ आल्यामुळे अर्थसंकल्पात कोणत्या विभागांना किती निधी मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.