कर्जतमधील उल्हास नदीवरील पूल निधीच्या प्रतीक्षेत; ग्रामस्थ त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:33 IST2020-11-27T00:33:03+5:302020-11-27T00:33:33+5:30
शिरसे - आवळस गावांना समांतर नवीन पूल बांधण्याची मागणी

कर्जतमधील उल्हास नदीवरील पूल निधीच्या प्रतीक्षेत; ग्रामस्थ त्रस्त
कर्जत : स्वातंत्र्योतर काळापासून कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर शिरसे - आवळस गावांना समांतर नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होत होती. परंतु या कामास निधी उपलब्ध होत नसल्याने हे काम सुरू होऊ शकलेले नाही.
कर्जत शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले आवळस गाव. परंतु उल्हास नदीवर शिरसे - आवळस गावांना समांतर पूल नसल्याने नागरिकांना आठ ते दहा किमीचा वळसा घालून प्रवास करावा लागतो. याचा सर्वाधिक त्रास हा आजारी रुग्ण किंवा गरोदर माता, भगिनींना दवाखान्यात नेत असताना होतो. पूल नसल्याने काही नागरिक वेळेत दवाखान्यात पोहोचू शकले नाहीत, म्हणून त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच काही नागरिक आपला वेळ वाचावा यासाठी पावसाळी भरलेल्या नदी पात्रातून आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतात. दुसरा त्रास हा लहान चिमुकल्यांना शाळेत जाताना होत आहे. कालानुरूप शिक्षण व्यवस्था बदलत असल्याने इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी गावातील मुलांना कर्जत येथे जावे लागते. याकरिता आठ ते दहा किमीचा वळसा मारून प्रवास करावा लागत असल्याने त्याचा आर्थिक भुर्दंडही सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे.
या परिसरातील राष्ट्रवादीचे एक कार्यकर्ते गणेश भोईर यांनी पालकमंत्री अदिती तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संबंधित विभागांस सूचना कराव्यात, अशी मागणी केली आहे.