नाल्यावरील पूल वर्षभर अर्धवट

By Admin | Updated: September 7, 2015 02:34 IST2015-09-07T02:34:56+5:302015-09-07T02:34:56+5:30

कुर्ला येथील कुरेशी नगरात वर्षभरापासून नाल्यावरील पुलाचे काम सुरू आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कंत्राटदार या पुलाचे काम अर्धवट सोडून पसार झाला आहे.

The bridge on the Nullah halfway through the year | नाल्यावरील पूल वर्षभर अर्धवट

नाल्यावरील पूल वर्षभर अर्धवट

मुंबई : कुर्ला येथील कुरेशी नगरात वर्षभरापासून नाल्यावरील पुलाचे काम सुरू आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कंत्राटदार या पुलाचे काम अर्धवट सोडून पसार झाला आहे. त्यामुळे रहिवाशांचे हाल होत आहेत. याबाबत पालिकेकडे अनेक तक्रारी करूनदेखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बरेच बांधकाम साहित्य चोरीला गेले आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
कुर्ल्यातील कुरेशी नगर आणि कसाईवाडा या परिसरात मोठी लोकवस्ती आहे. कुर्ला अथवा चेंबूर परिसरातून या ठिकाणी येण्यासाठी बंटर भवन मार्ग हा एकमेव रस्ता आहे. याच रस्त्यावर कुरेशी नगर नाला आहे. पूर्वी या नाल्यावर अगदी अरुंद पूल होता. मात्र गेल्या काही वर्षांत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा वाढल्याने एकाच वेळी दोन वाहने आल्यानंतर एका वाहनाला थांबवून ठेवावे लागत होते. त्यातच या परिसरात बंट्स महाविद्यालयदेखील काही वर्षांपूर्वी सुरू झाल्याने येथील वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली. शिवाय २६ जुलै २००५ ला झालेल्या मुसळधार पावसामुळे पालिकेने सर्व नाल्यांची रुंदीदेखील वाढवली आहे. त्यानुसार या नाल्यासह पुलाचेदेखील बांधकाम करण्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी पालिकेने आखला.
नाल्याचे रुंदीकरण झाल्यानंतर येथील पुलाचेदेखील बांधकाम करण्यात आले, मात्र पुलाच्या एका बाजूची संरक्षक भिंत कंत्राटदाराने अर्धवटच सोडली आणि पळ काढला आहे. या ठिकाणी केवळ सळ्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच कंत्राटदाराने बांधकामासाठी लागणाऱ्या अनेक लोखंडी सळ्या आणि लोखंडी पाइप याच ठिकाणी टाकून ठेवल्याने यातील बरेच सामान चोरीलादेखील गेले आहे. परिसरात अनेक मुले या नाल्याच्या परिसरात फिरत असतात. त्यामुळे पालिकेने तत्काळ या नाल्यावर संरक्षण भिंत उभारावी; शिवाय काम अर्धवट ठेवणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणीदेखील रहिवाशांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The bridge on the Nullah halfway through the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.