नामदेव मोरे / नवी मुंबईदेशातील सर्वात वेगाने विकसित होणारा जिल्हा म्हणून रायगडची ओळख निर्माण झाली आहे. सिडकोचा नैना प्रकल्प, आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे देशभरातील गुंतवणूकदारांनी या परिसरावर लक्ष केंद्रित केले आहे; पण विकासाच्या गती व त्यासाठी पाणीपुरवठा योजना यांची योग्य सांगड घालता आली नसल्याने रायगडच्या विकासाला ब्रेक लागला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कोंढाणे, बाळगंगा प्रकल्प ठप्प आहेत. नदींचे नाल्यात रूपांतर झाले असून विहिरी व तलावांच्या रक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात गंभीर परिणाम या परिसरातील नागरिकांना भोगावे लागण्याची शक्यता आहे. जेएनपीटी या देशातील सर्वात मोठ्या बंदराबरोबर सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ या परिसरात होत आहे, यामुळे संपूर्ण देशाचेच याकडे लक्ष लागले आहे. नैनाच्या पहिल्या टप्प्यात २७० पैकी २३ गावांचाच आराखडा तयार करण्यात आला. त्यामधील एकाही नोडचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. रखडलेल्या या कामांमुळे नैना परिसराचा व त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्याच्या विकासावर दुरगामी परिणाम होऊ लागला आहे. नैना क्षेत्रातील ठप्प झालेल्या कामांविषयी अनेक कारणे सांगितली जात असली, तरी खरे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विकसित होणाऱ्या शहराला पाणीपुरवठा कसा करायचा हेच आहे. नैना परिसराच्या विकासासाठी शासनाची व सिडकोची पूर्ण भिस्त १८०५ कोटी रुपयांचा बाळगंगा प्रकल्प, १ हजार कोटींचा कोंढाणे प्रकल्प व १५० कोटी रुपयांच्या हेटवणे प्रकल्पावर होती; पण तीनही प्रकल्पांचे काम अद्याप सुरूच झालेले नाही. पाणीच नसल्याने विकासाची गती कमी करावी लागली आहे. या परिसरात काळुंद्री, कासाडी, गाढी व इतर नद्यांचेही नाल्यात रूपांतर झाले आहे. रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात तलाव व विहिरी आहेत; पण या नैसर्गिक स्रोतांचे रक्षण करण्यात अपयश येत असून, फसलेल्या पाणी नियोजनाचा परिणाम विकासावर होऊ लागला आहे.
रखडलेल्या धरणांमुळे नैनासह रायगडच्या विकासाला ब्रेक
By admin | Updated: March 22, 2017 01:36 IST