महिलेच्या हत्येप्रकरणी प्रियकराला अटक; गुन्हे शाखेची कारवाई
By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 2, 2024 19:18 IST2024-04-02T19:17:47+5:302024-04-02T19:18:32+5:30
अखेर २९ मार्चला सदर वर्णनाचा तरुण पनवेलच्या ओरियन मॉल परिसरात येणार असल्याची माहिती हवालदार महेश पाटील यांना मिळाली होती.

महिलेच्या हत्येप्रकरणी प्रियकराला अटक; गुन्हे शाखेची कारवाई
नवी मुंबई : महिलेच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याने महिलेची हत्या करून पोबारा केला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान तो पनवेल परिसरात येणार असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा महिन्यांपूर्वी एका महिलेची हत्या झाली होती. गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या अनुशंघाने गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांनी सहायक निरीक्षक अलका पाटील, हर्षल कदम, दशरथ विटकर, मंगेश वाट, उर्मिला बोराडे आदींचे पथक केले होते. त्यामध्ये सदर महिलेसोबत एक तरुण अधून मधून रहायला असायचा अशी माहिती समोर आली होती. परंतु त्याच्याबद्दल कसलीही माहिती पोलिसांना मिळाली नव्हती. अखेर २९ मार्चला सदर वर्णनाचा तरुण पनवेलच्या ओरियन मॉल परिसरात येणार असल्याची माहिती हवालदार महेश पाटील यांना मिळाली होती.
त्याद्वारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पांडव जाधव (२१) याला ताब्यात घेतले असता, चौकशीत त्याने हत्येची व दोघांमधील प्रेमसंबंधाची कबुली दिली. घटनेच्या दिवशी दोघांनी मद्यपान केले असता त्यांच्यात वाद झाला होता. या वादात पांडव याने गळा आवळून तिची हत्या करून पळ काढला होता. त्यानंतर मागील सहा महिन्यांपासून तो महाराष्ट्र व गुजरात मध्ये ठिकठिकाणी ओळख लपवून राहत होता. तर सहा महिन्यांनी पोलिसांनाही घटनेचा विसर पडला असावा या विचाराने तो परत पनवेलमध्ये आला होता. मात्र पोलिस त्याच्या शोधातच असल्याने तो आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.