मृतदेह खड्ड्यात पुरल्याप्रकरणी दोघे निलंबित
By Admin | Updated: October 2, 2015 04:00 IST2015-10-02T04:00:11+5:302015-10-02T04:00:11+5:30
पोलिसांकडून अनोळखी मृतदेह प्राप्त झाल्यानंतर, त्यांच्यावर नियमानुसार अंत्यसंस्कार करून ते वेगवेगळ्या खड्ड्यात पुरणे गरजेचे असताना तब्बल १२ मृतदेह एकाच खड्ड्यात पुरल्याचा प्रताप

मृतदेह खड्ड्यात पुरल्याप्रकरणी दोघे निलंबित
पनवेल : पोलिसांकडून अनोळखी मृतदेह प्राप्त झाल्यानंतर, त्यांच्यावर नियमानुसार अंत्यसंस्कार करून ते वेगवेगळ्या खड्ड्यात पुरणे गरजेचे असताना तब्बल १२ मृतदेह एकाच खड्ड्यात पुरल्याचा प्रताप पनवेल नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी २४ सप्टेंबरला केला. या प्रकरणी नगर परिषदेने दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून आरोग्य निरीक्षकांची चौकशी लावली आहे.
पनवेल शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. तसेच रेल्वेचे जाळेदेखील शहरात पसरले आहे. यामुळे अपघातांच्या संंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अपघातामध्ये अनोळखी मृतदेहांची संख्या जास्त असते. संबंधित मृतदेह पोलिसांमार्फत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नगर परिषदेला विल्हेवाट लावण्यास दिले जातात. पनवेल नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने पोलिसांमार्फत प्राप्त झालेले हे १२ मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा खोदून त्यातच पुरल्याने या मृतदेहांची अवहेलना केली होती. या प्रकरणामुळे नगर परिषदेची उदासीनता यातून समोर आली. नगर परिषदेने आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करीत पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले व संबंधित प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच संबंधित मृतदेह आरोग्य विभागाला हस्तांतरित करण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट सांगण्यात आले. अखेर नगर परिषदेने आरोग्य विभागाच्या दिलीप जाधव व महादेव मोरे या दोन सफाई कर्मचाऱ्यांना निलंबित करून आरोग्य निरीक्षकांची चौकशी लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरोग्य निरीक्षक दिलीप कदम यांची या प्रकरणी चौकशी लावली असल्याची माहिती नगर परिषदेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला यांनी दिली. (प्रतिनिधी)